पुण्याहून राजगुरूनगरच्या दिशेने जाणाऱ्या एसटीला अपघात झाला. या अपघातामध्ये बस चालक आणि एक महिला गंभीर जखमी झाली असून बसमधील ८ ते १० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास मोशी येथील बनकर वस्ती येथे हा अपघात झाला. एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. यात चालक शंकर मारुती करांडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर बस स्थानकातून राजगुरूनगरच्या दिशेने बस क्रमांक एम. एच.१४-बी.टी.१७४५ ही जात होती. मोशी येथील बनकर वस्ती येथे बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. एसटी बस रस्त्याच्या दुभाजक तोडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. याचवेळी दुसऱ्या मार्गावरुन पुण्याचा दिशेला जात असणाऱ्या टेम्पोला बसने जोरदार धडक दिली. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये २२ ते २५ प्रवासी होते. या अपघातानंतर परिसरातील नागरिक तसेच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये टेम्पो चालक संतोष लोंढे हा देखील जखमी झाला आहे.