एकेकाळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून लौकिक असलेल्या पुण्यात सायकल वापरणाऱ्यांची संख्या घटत असताना शहरात सायकल चालवणारे वाढावेत, सायकल चालवा हा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत जावा, या हेतूने सुरू झालेला ‘सायकल फेरी’चा उपक्रम शहरात चांगलाच रुजला असून अगदी मोजक्या सायकलप्रेमींनी सुरू केलेल्या या उपक्रमात आता शहरातील सुमारे दहा हजारजण दर आठवडय़ाला सहभागी होत आहेत.
शहरातील सायकल वापर वाढावा, असा संदेश देणारा हा उपक्रम पुणे सायकल प्रतिष्ठानतर्फे अठरा-एकोणीस वर्षांपूर्वी सुरू झाला. हा उपक्रम सुरू झाला तेव्हा काही मोजकी डॉक्टर मंडळी आणि सायकलप्रेमींचा त्यात सहभाग होता. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सायकलवरून प्रचार फेरी आयोजित करून ही मंडळी सायकल चालवा हा संदेश नागरिकांना देत असत. पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढली, प्रतिसादही वाढला आणि दर बुधवारी देखील सायकल फेरी सुरू झाली. दर बुधवारची ही फेरी गेली अठरा वर्षे अत्यंत नियमितपणे सुरू असून या फेरीत सहभागी होणारे सायकलप्रेमी दर बुधवारी साधारण १५ ते २० किलोमीटर अंतराचे सायकलिंग करतात. विधी महाविद्यालयापासून फेरीला सुरुवात होते. सेनापती बापट रोड, विद्यापीठ, ब्रेमेन चौक, खडकी, रेंजहिल्स, पुणे-मुंबई रस्ता आणि तेथून परत असा या फेरीचा मार्ग असतो. रविवारी निघणारी फेरी ही शहराच्या वेगवेगळ्या भागातून आयोजित केली जाते आणि त्यातून प्रामुख्याने सायकल चालवा हा संदेश दिला जातो, अशी माहिती पुणे सायकल प्रतिष्ठानचे जुगल राठी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
याच उपक्रमात वर्षांतून एकदा देशव्यापी सायकल रॅली आयोजित केली जाते. ही ७०० ते ८०० किलोमीटर लांबीची रॅली गेली अनेक वर्षे नियमितपणे होत आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी आणि दर बुधवारी सुरू झालेल्या सायकल फेरीच्या या उपक्रमात सुरुवातीला सहभागी होणाऱ्यांची संख्या खूपच मर्यादित होती. हळूहळू सायकल चालवा हा संदेश तरुणांमध्येही चांगला रुजला आणि उपक्रमाचा प्रतिसाद वाढला. सायकलचा दैनंदिन वापर ज्यांना शक्य होत नाही असे अनेकजण या उपक्रमात सहभागी होऊन सायकल चालवण्याचा आनंद घेतातच शिवाय सायकल चालवा हा संदेशही आपापल्या भागात देतात.
पुणे सायकल प्रतिष्ठानच्या उपक्रमामुळे शहराच्या बहुतेक सर्व भागात आता आठवडय़ातून एकदा त्या त्या भागातील सायकलप्रेमी सकाळी जमून त्यांच्या भागात सायकलफेरी काढतात किंवा लांब अंतरावर सायकलिंगला जातात. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे एक चांगला संदेश नागरिकांपर्यंत जातो आणि अनेकजण उत्स्फूर्तपणे या फेरीत सहभागी होतात. पुण्यात अशाप्रकारे सायकल चालवण्याची हौस असणारे, छंद म्हणून सायकल चालवणारे आता किमान दहा हजारजण या उपक्रमातून तयार झाले आहेत, असेही राठी यांनी सांगितले.

series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
Somalias Pirates Stock Market in Harardhere
वित्तरंजन : भांडवली बाजारच; पण कुणाचा?
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच