प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेली राहुल गांधींची सभा.. मनासारखा झालेला प्रचार यामुळे निवडणुकीच्या आदल्या दिवशी थोडे निवांत होण्याच्या विचारात असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि उमेदवार विश्वजित कदम यांचा बुधवारचा दिवस हा रोजच्या प्रचाराच्या दिवसाएवढाच धामधुमीत गेला. पुण्यातील प्रचार मंगळवारी संध्याकाळी बंद झाल्यानंतर काँग्रेस भवनने एक प्रकारे सुटकेचा श्वास घेतला. उमेदवारी जाहीर झाल्यापासून गेले पंचवीस दिवस पक्षाच्या आणि विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी पळणाऱ्या कार्यकर्त्यांनी रिलॅक्स होण्यासाठी आपापले बेत आखले होते. मात्र, मनसे आणि काँग्रेसमध्ये पैसे वाटप प्रकरणावरून झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर कार्यकर्त्यांचा निवडणुकीचा आदला दिवस हा प्रचाराच्या दिवसांइतकाच धामधुमीचा ठरला. निवडणुकीच्या आदल्या दिवशी पक्षाच्या आणि दुसऱ्या दिवशीच्या नियोजनासंबंधीच्या मोजक्याच बैठकांना हजेरी लावण्याचे नियोजन कदम यांनीही केले होते. मात्र, कदम यांचा दिवस ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ करण्यात आणि झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर तातडीच्या बैठकांमध्येच गेला.
प्रचाराच्या पंचवीस दिवसांच्या धावपळीतून थोडी विश्रांती घेण्याच्या विचारात असलेले काँग्रेसचे काही पदाधिकारी, नेते सकाळीच कार्यालयात हजर झाले होते. निवडणुकीच्या आदल्या दिवशी सगळ्या विधानसभा मतदारसंघातील प्रमुखांच्या, नेत्यांच्या काही मोजक्या बैठका घेण्याचे नियोजन पक्षाने केले होते. निवडणुकीच्या दिवशी कुठे बुथ असतील, त्यावर कोणते कार्यकर्ते असतील, दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लक्ष कसे ठेवायचे, याबाबतचे नियोजन करण्यासाठी बैठका होत्या. मात्र, मनसेने केलेल्या आरोपांबाबत पक्षाकडून काय भूमिका घ्यावी, कायदेशीर भूमिका कशी घेता येईल, निवडणूक आयोगाकडून काय कारवाई होऊ शकते, पोलीस काय कारवाई करू शकतात हा खल करण्यात आणि माध्यमे व कार्यकर्त्यांना उत्तरे देण्यातच निवडणुकीचा आदला दिवस संपला.

दिवसभर बैठका आणि फोन..
गेले पंधरा दिवस अनिल शिरोळे यांचे प्रचाराचे कार्यक्रम रोज सकाळी अगदी लवकरच सुरू होत होते. ‘परिचय’ या त्यांच्या हॉटेलवरच्या कार्यालयात ते बुधवारी सकाळी लवकरच पोहोचले; पण रोजच्यासारखी लगेच बाहेर पडायची घाई नव्हती. भाजपचे जास्तीतजास्त मतदार घराबाहेर कसे पडतील याचे नियोजन शिरोळे बुधवारी दिवसभर करणार होते. मात्र, त्यात पैसेवाटप प्रकरण आणि सांगलीची एक लाख नावे या दोन्ही आघाडय़ांवर शिरोळे यांची बुधवारी सकाळपासूनच व्यूहरचना सुरू झाली. कार्यालयातून त्यांनी त्यासाठी फोन सुरू केले.
त्यानंतर लगेचच विधानसभा निहाय कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठका सुरू झाल्या. कोथरूड मंडल अध्यक्ष जगन्नाथ कुलकर्णी यांच्या घरी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिरोळे पोहोचले. तेथे प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत दुबार यादीतील मतदान कसे थांबवता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. मतदान केंद्रातील प्रतिनिधीने कशी हरकत घ्यायची, शुल्क कसे भरायचे आदींबाबतही सूचना देण्यात आल्या. कोणताही प्रसंग आला तरी गडबडून, गोंधळून जाऊ नका. आपल्याला कोणीही विचलित करायचा प्रयत्न केला, तरी जागा सोडू नका. तसे झाल्यास संपूर्ण मतदानावर परिणाम होतो, ही गोष्टही शिरोळे यांनी सर्वाना बजावली.
 त्यानंतर पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या घरी तेथील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. नंतर वडगावशेरीत काही भेटीगाठी झाल्या. दुपारी पुन्हा शिरोळे ‘परिचय’वर आले. तेथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. ती पार पडत असतानाच नागरिक तेथे मोठय़ा संख्यने येत होते. मतदारयादीत नाव आलेले नाही, अशा तक्रारी प्रामुख्याने केल्या जात होत्या. त्यांचेही निराकरण सुरू होते. दुसरीकडे बूथप्रमुखांच्या नियुक्त्या सगळीकडे झाल्या का, त्यांची तयारी झाली का, उद्याचे नियोजन पूर्ण झाले का, याचीही चौकशी करणारे कॉल्स प्रमुखांना सुरू होते. सायंकाळी पुन्हा कॅन्टोन्मेंट आणि नंतर शिवाजीनगरच्या बैठका झाल्या. दिवसभर मोबाईल सुरूच होते.. मतदानाचे नियोजनही सुरू होते.. आणि ठिकठिकाणाहून शुभेच्छा देणारेही फोन येत होते.. प्रत्यक्ष भेटीत आणि प्रत्येक फोनवर शिरोळे सगळ्यांना संपूर्ण लक्ष मतदानावर केंद्रित करा, असेच सांगत होते.
 

मतदानाची व्यूहरचना पोलीस ठाण्यातच

दीपक पायगुडे यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच मंगळवारी सायंकाळी त्यांना दूरध्वनी आला.. पैसे वाटताना कार्यकर्त्यांनी काहीजणांना पकडले असल्याची माहिती देण्यात आली.. पैसे वाटणारे भारती विद्यापीठाशी संबंधित असल्याने पायगुडे यांनी तातडीने समर्थ पोलीस ठाणे गाठले.. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना अटक करावी, अशी मागणी करून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आणि हे आंदोलन बुधवारीही सुरू होते. त्यामुळे मतदानाचा आदला दिवस पायगुडेंनी पोलीस ठाण्यातच काढला.. आंदोलनाबरोबर तेथूनच त्यांची मतदानाच्या दिवसाची व्यूहरचनाही सुरू होती.
आंदोलनाच्या निमित्ताने मंगळवारी संध्याकाळपासून ठिय्या देऊन बसलेले पायगुडे बुधवारीही त्यांच्या मागणीवर ठाम होते. नारायण पेठेतील पक्षाच्या कार्यालयात एकही कार्यकर्ता दिसत नव्हता. नगरसेवक व पदाधिकारी यांचाही ठिय्या समर्थ पोलीस ठाण्यातच होता. पैसे वाटताना पकडलेल्या आरोपींविरुद्ध काहीजण पोलिसांकडे पुरावे सादर करीत होते. आरोपींवर व आंदोलकांवर कोणते गुन्हे दाखल झाले याची काहीजण माहिती घेत होते. मध्येच घोषणाबाजीही होत होती, तर  पायगुडे प्रसारमाध्यमांसमोर त्यांची बाजू मांडत होते. मनसेचे हे आंदोलन सुरू असताना मतदानाच्या दिवसाची व्यूहरचनाही होत होती. वेगवेगळी पथके आपापल्या भागात हे काम करीत होती. ठिय्या आंदोलनातून मोबाईलवरून पायगुडे कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देत होते. मतदानाचा आदला महत्त्वाचा दिवस पोलीस ठाण्यातच गेला असला, तरी जाहीर प्रचार बंद असतानाही आंदोलनाच्या निमित्ताने पायगुडे यांचा प्रचार होत असल्याचे कुजबूज सुरू होती.
 
‘दोन महिन्यांनंतर अर्धा-पाऊण तास उशिरा उठलो!’

काही दिवसांपूर्वी ‘असा घडला भारत’ हे पुस्तक प्रा. सुभाष वारे यांनी वाचायला घेतले होते. मधल्या प्रचाराच्या काळात वाचन वगैरेशी त्यांचा संपर्कच तुटला होता. मंगळवारी प्रचार संपल्यानंतर रात्री उशिरा ते घरी गेले आणि ते पुस्तक त्यांनी पुन्हा चाळायला घेतले.
‘बुधवारी सकाळी अर्धा-पाऊण तास उशिरा उठलो! प्रचारानंतर पहिल्यांदाच थोडासा निवांतपणा अनुभवायला मिळाला.’ प्रचाराच्या आदल्या दिवशीचा वारे सरांचा हा अनुभव खूपच बोलका होता. मंगळवारी संध्याकाळी जाहीर प्रचार संपल्यानंतर वारे सरांबरोबरच ‘आप’चे कार्यकर्तेही जरासे निवांत झाले आहेत. ‘आप’च्या ‘आशीर्वाद मंगल कार्यालया’त बुधवारी दुपारी मतदानाच्या दिवशीच्या बूथ व्यवस्थापनासाठीच्या बैठकीचीच लगबग होती. थेट प्रचार करण्यावर बंदी असल्यामुळे वैयक्तिक भेटीगाठींवरच वारे यांनी बुधवारी भर दिला. गेला दीड महिना पक्षाचे कार्यकर्ते स्वखुशीने अक्षरश: राबत होते. बुधवारचा दिवस वारे यांनी अशा कार्यकर्त्यांना जाऊन भेटण्यात घालवला. स्वामी विवेकानंद सोसायटीचे पदाधिकारी, मार्केटयार्डमधील आंबेडकर वसाहतीमधील रहिवासी आणि डायस प्लॉट येथील कार्यकर्ते हे सगळे ‘आप’साठी काम करत होते. या सर्वाची त्यांनी भेट घेतली.
पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचेही प्रा. वारे सदस्य आहेत. त्यामुळे राज्यातल्या ज्या मतदारसंघांमधील प्रचार अद्याप संपलेला नाही तेथून वारे यांना ढीगभर आमंत्रणे आली आहेत. पुण्यात प्रचाराच्या कामात असल्यामुळे आतापर्यंत या आमंत्रणांचा त्यांना विचारच करता येत नव्हता; पण निवडणूक झाल्यावर लगेच त्या ठिकाणी जायचे त्यांनी ठरवले आहे. त्याचे नियोजनही त्यांनी बुधवारी केले. मतदानाच्या दिवशी ‘आप’चे कार्यकर्ते सलग १२-१३ तास बूथवर काम करणार आहेत. त्यामुळे सकाळी स्वत: मतदान केल्यानंतर शहरात विविध बूथवर जाऊन ते कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणार आहेत. काही उमेदवार मतदानाच्या आदल्या दिवशी आवर्जून देवदर्शन करतात. त्याबाबत विचारल्यावर वारे मिश्किलपणे म्हणतात की, माझा विश्वास फक्त जनता जनार्दनावरच आहे.