सीएसच्या परीक्षेमध्ये आपल्याच संस्थेचे विद्यार्थी मेरिटमध्ये आल्याचे दाखवून जाहिरातबाजी करणाऱ्या संस्थांची तक्रार आल्यास त्याची दखल घेऊन कारवाई करण्याची भूमिका ‘द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया’ ने घेतली असून संस्थांच्या जाहिरातबाजीला विद्यार्थी आणि पालकांनी भुलू नये, असे आवाहन इन्स्टिटय़ूटने केले आहे.
सीएसच्या डिसेंबरमध्ये झालेल्या परीक्षेचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. सीएसच्या एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षेमध्ये देशात सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या पंचवीस विद्यार्थ्यांची यादी इन्स्टिटय़ूटतर्फे जाहीर केली जाते. पहिल्याच प्रयत्नामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये स्थान मिळते. सीएसच्या एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल परीक्षेमध्ये आपल्याच क्लासच्या विद्यार्थ्यांना कसे यश मिळाले हे दाखवण्याची स्पर्धाच क्लासेसमध्ये सुरू झाली आहे. इन्स्टिटय़ूटने जाहीर केलेल्या मेरिट लिस्टमध्ये नाव नसलेले आपल्या क्लासचे विद्यार्थीही मेरिट लिस्टमध्ये आल्याचे दाखवून क्लासेसची जाहिरातबाजी सुरू आहे.
‘अशा प्रकारची जाहिरातबाजी करणाऱ्या क्लासेसबाबत तक्रारी आल्यास त्याची दखल घेतली जाईल. या क्लासेसबाबत जी शक्य असेल ती कारवाई करण्याबाबतही पावले उचलण्यात येतील. परीक्षांची मेरिट लिस्ट इन्स्टिटय़ूटच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. विद्यार्थ्यांनी सर्व बाबींची खात्री करूनच क्लासला प्रवेश घ्यावा. जाहिरातबाजीला बळी पडू नये,’ असे इन्स्टिटय़ूटचे उपाध्यक्ष विकास खरे यांनी सांगितले.