येत्या काळात कोणत्याही एकाच कलेच्या आधारे कलासंस्थांना उभे राहणे अवघड होत असून, सगळ्याच कलांच्या सहअस्तित्वाशिवाय कलांसंस्थांचे अस्तित्व टिकू शकणार नाही, असे लक्षात आल्यानेच ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या नाटय़संस्थेने सकळ ललित कलांना एकत्र आणण्यासाठी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी केली असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात या संस्थेची यंदा निवड करण्यात आली आहे.

नाटक, चित्रकला, संगीत, नृत्य अशा सगळ्याच कलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या विकासाला पोषक वातावरण तयार व्हावे, या हेतूने ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या नाटय़संस्थेने ‘महाराष्ट्रीय मंडळ’ या संस्थेच्या मदतीने एक भव्य संकुल निर्माण करण्याचा ध्यास घेतला आहे. सकळ ललित कलांच्या वर्धनासाठीचा हा प्रयत्न म्हणूनच अधिक वाखाणण्यासारखा आहे.

संपूर्ण देशात हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढय़ाच ठिकाणी प्रायोगिक रंगभूमी आजही कस धरून आहे. या रंगभूमीला हक्काचा आधुनिक रंगमंच आणि त्याबरोबरच तालमीसाठीची सोय या संकुलात असणार आहे. प्रयोगासाठी येणाऱ्या रंगकर्मीसाठी याच ठिकाणी निवासाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. सगळ्याच कलांचे एकत्र अस्तित्व राहू शकेल, अशा या संकुलात संगीताच्या मफलींसाठी हा रंगमंच जसा उपलब्ध असणार आहे, तसेच आधुनिक माध्यमांच्या साह्य़ाने उत्तम संगीत ऐकण्याची सोयही या संकुलात खास निसर्गरम्य वातावरणातील कॅफेटेरियामध्ये करण्यात येणार आहे. कलावंतांना त्यांच्या आविष्कारातील सर्जनासाठी उपयुक्त ठरणारे वातावरण येथे असेल आणि त्यामुळे त्यांना कशासाठीही बाहेर जाण्याची आवश्यकताच भासणार नाही, असे या संकुलाचे स्वरूप असेल, असे पुरंदरे यांनी सांगितले.

चित्रकारांसाठी या संकुलात खास वेगळ्या पद्धतीचे कलादालन उभारण्यात येणार आहे. दुमजली स्वरूपातील हे दालन चित्रकारांचे विशेष आकर्षण तर असेलच, परंतु त्यांना स्वस्थचित्ताने आपली कला वृिद्धगत करता यावी, यासाठी खास दालनेही निर्माण करण्यात येणार आहेत. चित्रकारांना तेथे कितीही वेळ व्यतीत करण्यास आडकाठी असणार नाही. या संकुलाच्या परिसरात असलेल्या शाळांमधील मुलांसाठीही संकुलात विशेष शिबिरांचे आयोजन करण्याची कल्पना असल्याचे पुरंदरे यांनी सांगितले.

नृत्यकलेतील कलावंतांसाठी उपयुक्त असणाऱ्या सुविधा असणे फार आवश्यक असते. या संकुलात त्यासाठी विशेष लक्ष पुरवण्यात येणार आहे. मोठय़ा शहरांमध्ये नृत्यशिक्षणाचे वर्ग मोठय़ा प्रमाणावर आहेत. तेथे शिकणाऱ्यांना नंतरच्या काळात या कलेचे संवर्धन करण्यासाठी कोणत्याच सोयी नाहीत. त्यामुळे हे सकळ ललित कला संकुल त्यांच्यासाठी एक आदर्श ठरावे, असा संस्थेचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकळ ललित कलांच्या माध्यमाबद्दल गंभीरपणे चर्चा करण्यासाठीही हे संकुल स्वागतशील असेल. देशातील विविध लोकपरंपरांना या ठिकाणी येऊन आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे कलांच्या सगळ्याच अंगांना स्पर्श करीत त्यांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न असेल. त्यासाठी सगळ्याच क्षेत्रातील कलावंतांनी एकत्र येऊन आपल्या कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक ठरणार आहे, असेही पुरंदरे म्हणाले. (या संस्थेस आर्थिक साह्य़ करण्यासाठी कृपया ‘महाराष्ट्रीय मंडळ’ या नावाने धनादेश काढावेत.)