माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंच्या जावयाच्या मोटारीतून तीस तोळ्यांचे दागिने ठेवलेली पर्स चोरटय़ांनी लंपास केली. लष्कर भागातील एसजीएस मॉलसमोर शुक्रवारी (२३ सप्टेंबर) रात्री ही घटना घडली.

ढोबळेंची विवाहित मुलगी कोमल साळुंखे (वय ३४,रा. भोसरी) यांनी यासंदर्भात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोबळेंचे जावई आणि मुलगी शुक्रवारी सायंकाळी लष्कर भागात आले होते. डॉ.आंबेडकर रस्त्यावर त्यांनी मोटार लावली. तेथून कोमल आणि तिचे पती एसजीएस मॉलमध्ये खरेदीसाठी गेले. रात्री नऊच्या सुमारास खरेदी करुन ते बाहेर पडले. त्या वेळी मोटारीचा दरवाजा उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोमल यांनी पर्समध्ये तीस तोळयांचे दागिने ठेवले होते. चोरटयांनी पर्स लांबविल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी एसजीएस मॉलच्या परिसराची पाहणी केली. मॉलच्या समोरील रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांना चोरटय़ांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलीस उपनिरीक्षक एस.पी. शिंदे तपास करत आहेत.