कृषीपंपांसाठी महावितरण कंपनीने उभारलेल्या यंत्रणेला सध्या चोरांची वाळवी लागली आहे. वीज का गेली याचा शोध घेण्यासाठी ट्रान्सफॉर्मपर्यंत धाव घेतली की केवळ वीजच नव्हे, तर दोन लोखंडी खांबावर अगदी वेल्डिंग करून बसविलेला ट्रान्सफॉर्मरच गायब झाल्याचे दिसते.. या प्रकाराने महावितरण पुरते हैराण झाले असून, पुणे जिल्ह्य़ामध्ये मागील १५ महिन्यांत तब्बल ७०५ ट्रान्सफॉर्मर चोरांनी गायब केले आहेत. त्यातून सुमारे दहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणबरोबरच संबंधित कृषी ग्राहकांनाही याचा मोठा फटका बसतो आहे.
महावितरण कंपनीच्या ‘फिडर सेपरेशन’ या महत्त्वाच्या योजनेमध्ये ग्रामीण भागामध्ये गावठाण व शेतीसाठी विजेचा पुरवठा वेगवेगळा करण्यात आला आहे. शेतीसाठी ठराविक वेळेलाच वीजपुरवठा सुरू ठेवला जातो. कृषीपंपांसाठी असलेली यंत्रणा व ट्रान्सफॉर्मर प्रामुख्याने निर्जन भागामध्ये आहेत. त्याचाच फायदा चोरटय़ांकडून घेतला जात आहे. ट्रान्सफॉर्मरमधून वीज सुरू असताना त्याला हात लावणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखेच आहे. त्यामुळे चोरटय़ांनी शेतीसाठी वीज बंद असल्याच्या वेळांचा चांगलाच ‘अभ्यास’ केला असल्याचे या चोऱ्यांवरून दिसून येते.
वीज पुरवठय़ाच्या यंत्रणेत अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या एका ट्रान्सफॉर्मरची किंमत सुमारे एक लाख ते दीड लाख रुपये आहे. पुणे जिल्ह्य़ामध्ये चोरीला गेलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये पुणे परिमंडलातील मुळशी विभागात ११९, मंचर विभागात १२, तर राजगुरूनगर विभागात १२७ ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले आहेत. बारामती परिमंडलात बारामती, केडगाव व सासवड विभागात ४४७ ट्रान्सफॉर्मरची चोरी झाली आहे. या चोऱ्यांमुळे महावितरण कंपनीचे मोठे नुकसान होते, मात्र ट्रान्सफॉर्मर नसल्याने व नवा ट्रान्सफॉर्मर बसविण्यास वेळ लागत असल्याने कृषी ग्राहकांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे.

ट्रान्सफॉर्मरची चोरी कशासाठी?

लाख ते दीड लाख रुपये किंमत असणारा ट्रान्सफॉर्मर कुठे बसविण्यासाठी नव्हे, तर चक्क भंगारात कवडीमोल भावाने विकण्यासाठी चोरला जातो. ट्रान्सफॉर्मरच्या आतील भागामध्ये तांब्याच्या पट्टय़ा असतात, तर मोठय़ा प्रमाणावर ऑईलही टाकलेले असते. या दोन घटकांच्या विक्रीसाठी ट्रान्सफॉर्मर चोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. चोरी रोखण्यासाठी ट्रान्सफॉर्मर अगदी वेल्डिंग करून खांबांवर बसविले जातात. मात्र, चोरांच्या टोळ्या काहीना काही खटाटोप करून त्याची चोरी करतात.
 

ट्रान्सफॉर्मर सांभाळण्याचे आवाहन

ट्रान्सफॉर्मरची चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गस्त घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीला महावितरण कंपनीकडून वाहन व कर्मचारीही देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही या चोऱ्या थांबलेल्या नाहीत. त्यामुळे आता संबंधित ग्राहकांनीच या ट्रान्सफॉर्मरकडे लक्ष ठेवावे व चोरीबाबत महावितरणला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ट्रान्सफॉर्मर वारंवार चोरीला जात असलेल्या भागामध्ये ट्रान्सफॉर्मर बदलून न देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.