अभिनेते विक्रम गोखले यांचे मत

‘‘देशात केवळ एकच नव्हे तर जागोजागी शेकडो कन्हैया आहेत. जो उठतो तो भारतीय लष्करावर टीका करतो. देशाची सुरक्षा करणाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे,’’ असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले. मृत्यू पावलेल्या सैनिकाच्या बाबतीत ‘सैन्यात जायला आम्ही सांगितले होते का,’ असे म्हणणाऱ्या मंत्र्याला जोडय़ाने मारायला हवे, असेही ते म्हणाले.

‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन’तर्फे गोखले यांना रविवारी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते ‘बलराज साहनी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

लेखिका इंदुमती जोंधळे यांना या वेळी ‘कैफी आझमी पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. प्रतिष्ठानचे सचिव सुरेश टिळेकर, विश्वस्त शिवानी हरिश्चंद्रे, धनंजय कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.

कारगीलमध्ये कार्यरत असलेले जवान संतोष शितोळे, सचिन कदम व मिथुन थोरात या तिघा जवानांच्या पत्नी या कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्यांचा आणि गीतांमधून जनजागृती करणाऱ्या नीलिमा बोगावत यांचा गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गोखले म्हणाले, ‘‘युद्धात लढलेल्या मोठमोठय़ा व्यक्तींबरोबर काही कलाकार दूरचित्रवाणीवर हुज्जत घालताना बघायला मिळाले. त्यांची निंदा करावी तेवढी कमीच आहे. ‘सैन्याकरिता आपण जरा जास्तच भावुक होतो,’ असे म्हणणाऱ्यांना सैनिक असणे म्हणजे नेमके काय असते हे माहीतच नाही. माझे वडील व मी अनेक वर्षांपासून युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांसाठी काम करतो. माझा भाचा हवाई दलात असून त्याला मी जवळून पाहिले आहे. प्रेक्षक कलाकारांवर प्रेम करतात, परंतु कलाकार जेव्हा गाढवासारखे वागतात, तेव्हा समाज त्यावर व्यक्त का होत नाही? त्यांचे चित्रपट ‘हाऊसफुल’ का करतात?, त्यांच्या विरोधात लिहीत का नाही, किंवा मोर्चे का काढत नाहीत, असा प्रश्न पडतो.’’

बलराज साहनींना आपण भेटलो, तेव्हाच्या आठवणी गोखले यांनी सांगितल्या, तसेच सर्व नटांनी साहनी यांचा अभ्यास करायला हवा, असे ते म्हणाले.

कैफी आझमी आणि साहिर लुधियानवी यांनी आपल्या रचनांमधून सामान्य माणसाला जगण्याची उमेद दिली, असे जोंधळे यांनी सांगितले.

‘शबाना तिहेरी तलाकविषयी का बोलत नाही?’

‘शबाना आझमी तिहेरी तलाकबद्दल का बोलत नाही? त्या मुस्लीम स्त्रिया तुझ्या बहिणीच आहेत ना?, तुला मुस्लीम समाजातून काढून टाकतील अशी भीती वाटते का? चित्रपटसृष्टीतील सर्व खान का बोलत नाहीत,’ असा प्रश्न विक्रम गोखले यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘ऑस्ट्रेलियात झालेल्या एका चित्रपट महोत्सवात काही पाकिस्तानी कलाकार उपस्थित राहिले होते. या कलाकारांनी त्यांना पाकिस्तानात मिळालेले पुरस्कार भारतीय लष्करावर दगडफेक करणाऱ्यांना बहाल केले होते. त्या सोहळ्यात काही भारतीय कलाकार त्यांच्यात मिसळले असे मोबाइलवर वाचायला मिळाले. शबाना आणि जावेद अख्तर यांच्याशी माझा चांगला स्नेह आहे, परंतु ते तिथे का गेले होते, असा प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो.’’

‘विज्ञानवादी सावरकर ब्राह्म समाजाला का मान्य नाहीत?’

‘‘ब्राह्म समाजातील जी वैचारिक मंडळी आहेत, त्यांना विज्ञानवादी सावरकर पटतात, परंतु भाबडय़ा समाजाला ते पचत नाहीत. ते रस्त्यातून जाता-जाता गाईला हात लावून जातात,’’ असेही गोखले म्हणाले.