मागील अनेक वर्षांपासून शहरामध्ये विविध ठिकाणी अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे. पुणे-मुंबई मार्गावर ही वाहतूक सर्वाधिक असून, या वाहतुकीचे जाळे आता घट्ट झाले आहे. १० जानेवारीला पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद असताना या अवैध वाहतुकीच्या घट्ट जाळ्याची प्रचिती आली. शहरातून रोजच शेकडो नागरिकांची धोकादायक पद्धतीने वाहतूक होत असताना वाहतूक शाखा किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काहींच्या ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील लोहमार्गावरील हँकॉक पूल पाडण्यासाठी १० जानेवारीला पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एसटीने पुढाकार घेऊन प्रवाशांसाठी शंभरहून अधिक जादा गाडय़ा सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मुंबईच्या प्रवासाची सोय झाली. मात्र, त्याचवेळेला पुणे रेल्वे स्थानकाजवळील परिसरातून अवैधरीत्या मोठय़ा प्रमाणावर प्रवाशांची वाहतूक होत असल्याचेही दिसून आले. मुंबईच्या प्रवासासाठी त्या वेळी नागरिकांकडून तब्बल सहाशे ते नऊशे रुपये उकळण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानक परिसराच्या जवळ व एसटी स्थानकाच्या बाहेर रोजच अवैध प्रवासी वाहतुकीतील वाहने मोठय़ा प्रमाणावर थांबलेली दिसतात. अनेकदा या प्रवासी वाहतुकीतील मंडळींचे एजंट थेट एसटी स्थानकात शिरून प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीकडे वळवतात. अनेकदा स्थानकात जात असलेल्या प्रवाशांना रस्त्यातच अडवून व कमी प्रवास भाडय़ाचे आमिष दाखवून या वाहतुकीकडे खेचले जाते. पुणे स्थानकाबरोबरच शिवाजीनगर, स्वारगेट एसटी स्थानक, त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात पुणे- मुंबई महामार्गालगत चिंचवड व निगडी येथेही अवैध प्रवासी वाहतुकीतील वाहने मोठय़ा प्रमाणावर असल्याचे दिसते.
अवैध प्रवासी वाहतुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांकडे कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना नसतो. यातील सर्वच गाडय़ा खासगी परवान्याच्या असतात. त्यामुळे त्यातून प्रवाशांची वाहतूक करणे धोकादायक ठरते. पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावर अनेकदा या वाहनांचे अपघात झाले आहेत. त्यात काहींना जीव गमवावा लागला, तर काहींना गंभीर जखमी व्हावे लागले. संबंधित वाहन हे प्रवासी वाहतुकीसाठी अवैध असल्याने अपघातग्रस्तांना विमा किंवा इतर कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नाही.
वाहनांकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना नसल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालय त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांकडे त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे दिसते. एसटीने अनेकदा या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला, पण त्याला वेळोवेळी आरटीओ किंवा वाहतूक शाखेकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. काही वेळेला लुटुपुटूची कारवाई करून आपण ‘कार्यरत’ असल्याचे दाखविले जाते. पण, एक-दोन दिवसांतच ही अवैध प्रवासी वाहतूक पुन्हा जोमात सुरू होते. वाहतूक शाखा व आरटीओतील काही मंडळींचा अवैध वाहतुकीतील मंडळींशी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार असल्यानेच नागरिकांची धोकादायक वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र आहे.