पुण्याला महिला संवेदनशील शहर बनवण्यासाठी महिला सद्यस्थितीचा जो अहवाल तयार करून घेण्यात आला आहे त्यातून स्वच्छतागृहांची समस्या समोर आली आहेच; पण गेली काही वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून प्राधान्याने ही समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुळशीबागेत होणारी महिलांची मोठी गर्दी लक्षात घेता तेथे स्वच्छतागृहाची गरज होती. मात्र, तेथे महिला स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे सर्वप्रथम तेथे स्वच्छतागृहाची उभारणी केली. नुकतेच अशाच प्रकारचे काम स्वारगेट येथेही सुरू केले आहे. माझ्या मतदारसंघामधील काही शाळांमध्येही मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्याची कामे सुरू आहेत. महापालिकेनी ज्या इमारती भाडे तत्त्वावर विविध कार्यालयांना दिल्या आहेत तेथेही महिलांसाठी स्वच्छतागृह नव्हती. आम्ही पाठपुरावा करून ती बांधून घेतली.
स्वच्छतागृहांची उभारणी एक वेळ सोपी आहे; पण त्यांची देखभाल दुरुस्ती आणि दैनंदिन स्वच्छता या गोष्टींकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्षच होते. महापालिकेची नव्याने बांधलेली स्वच्छतागृह असोत किंवा ज्या जुन्या स्वच्छतागृहांची नव्याने बांधणी करण्यात आली आहे ती स्वच्छतागृह असोत, तेथील अस्वच्छता हा गंभीर प्रश्न आहे. स्वच्छतागृहांना फक्त रंगीत मुलामा देण्याचे काम सुरू आहे. ती चकचकीत करण्याची कामे होत आहेत. या कामांवर खर्चही खूप केला जात आहे. स्वच्छतेकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष होत आहे. त्यावर उपाय म्हणून स्वच्छतागृहाच्याच वरती पहिल्या मजल्यावर एक खोली बांधून ती देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याला दिली, तर स्वच्छता राहू शकते, असा अनुभव आहे. त्यामुळे तशाच पद्धतीने हे काम करणे आवश्यक आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष हीच मोठी समस्या आहे. त्यामुळे ती असूनही वापरली जात नाहीत. शाळांमध्येही स्वच्छतागृह बांधून दिली, तरी शाळेत सफाईसाठी स्वतंत्र कर्मचारी नसेल, तर तेथील स्वच्छतागृहांची अवस्थाही वाईट होते.
शहराचा विचार केला, तर महिला स्वच्छतागृहांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यावर उपाय म्हणून ज्या ज्या ठिकाणी महिला स्वच्छतागृह आवश्यक आहेत अशी ठिकाणे निश्चित करून त्या जागांवर आरक्षण टाकावे, अशी सूचना मी केली आहे. त्याशिवाय हा प्रश्न सुटू शकणार नाही.