हिमालयातील एका शिखराला पुण्यातील गिर्यारोहक नलिनी सेनगुप्ता यांचे नाव देण्यात आले असून ‘पीक ५२६०’ हे शिखर आता ‘नलिनी’ म्हणून ओळखले जाणार आहे. गिरिप्रेमीच्या गिर्यारोहकांनी पहिल्यांदा हे शिखर सर करून त्याला ओळख मिळवून दिली आहे.
एव्हरेस्ट, मकाऊ अशा मोहिमांनतर या वर्षी गिरिप्रेमींनी हिमालयातील इंद्रासन व ‘पीक ५२६०’ ही शिखरे सर करण्याची जोडमोहीम आखली. आनंद माळी यांच्या नेतृत्वाखाली किरण साळस्तेकर, भूषण शेट, अनिकेत कुलकर्णी, पवन हडोळे, दिनेश कोतकर व संकेत धोत्रे या गिर्यारोहकांच्या संघाने ‘पीक ५२६०’ हे अनामिक शिखर प्रथमच सर करून एका नवीन शिखराचे नामकरण करण्याचा मान पटकावला.
हिमालयातील कोणत्याही अनामिक शिखरावर जो संघ किंवा व्यक्ती प्रथम चढाई करतो त्या संघाला त्या अनामिक शिखराचे नामकरण करण्याचा मान मिळतो. त्यानुसार या शिखराला गिरिप्रेमीकडून ‘माउंट नलिनी’ असे नाव देण्यात आले आहे. पुण्यातील विद्या व्हॅली शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी सेनगुप्ता यांच्या गिर्यारोहणातील कार्याची ओळख ठेवण्यासाठी या शिखराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. सेनगुप्ता यांनी १९७० च्या सुमारास नेहरू पर्वतारोहण संस्थेतून महिलांसाठी असलेला गिर्यारोहणाचा प्राथमिक अभ्यासक्रम पूर्ण केला. गेली पन्नास वर्षे त्या गिर्यारोहणाचा प्रचार करत आहेत. आज त्यांच्या शाळेत मुलांचा व पालकांचा ट्रेकिंग क्लबही आहे.
या मोहिमेदरम्यान इंद्रासन या आव्हानात्मक शिखरावर संघाने शेवटच्या कँपपर्यंत चढाई केली. या मोहिमेत मात्र गिरिप्रेमीच्या सदस्यांनी सर्वच्या सर्व मार्ग खुला केला. मात्र, शेवटच्या टप्प्यात असताना वातावरण बिघडल्याने सर्व बाजूंनी हिमप्रपात होऊ लागले. त्यामुळे संघाला ही मोहीम थांबवावी लागली.