वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने कोंडीच्या घटनांत वाढ

पिंपरी चिंचवड शहरामधील उड्डाणपुलांखाली झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक खोळंबण्याचे प्रकार सातत्याने घडतात. थेरगांव येथील डांगे चौक, काळेवाडी फाटा, भोसरी येथील उड्डाणपूल या पुलांखाली झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. मात्र पोलीस आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्यामुळे ते नागरिकांना अडचणीचे ठरत आहे.

भोसरी येथील उड्डाणपुलाखालील जागा छोटय़ा विक्रेत्यांनी व्यापल्या आहेत. येथे हातगाडय़ा लावून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हातगाडय़ांवर अंडी किंवा चायनीज पदार्थ विकले जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे याच हातगाडय़ांवर रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा जमतो. त्यामुळे वादविवादाचेही प्रकार सुरू असतात. फळभाजी विक्रेतेही उड्डाणपुलाखाली भाजीपाला विक्रीसाठी बसून अतिक्रमण करतात. अनधिकृत वाहनतळामुळे उड्डाणपुलांच्या खालील जागा कमी होत आहेत आणि त्यातच छोटय़ा व्यवसायिकांची त्यात भर पडत असल्याचे चित्र भोसरीत आहे. महापालिकेने काही दिवसांपूर्वी अतिक्रमणांवर कारवाई केली होती. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे अतिक्रमणांनी उच्छाद मांडला आहे. या सर्व प्रकाराला मिळत असलेले राजकीय पाठबळही कारणीभूत आहे.

मतदारांचे लांगूनचालन करण्यासाठी काही नगरसेवक अनधिकृत वाहनतळ असो अथवा अतिक्रमण करुन सुरु असलेले व्यवसाय असोत, त्यांना बिनदिक्कतपणे मदत करतात. चिंचवड उड्डाणपुलाखाली टेम्पो आणि रिक्षा यांचे पार्किंग केले जाते. चिंचवड येथील उड्डाणपुलाखाली सेवा रस्त्याचे काम सुरु आहे. तेथील अनधिकृत वाहनतळामुळे वाहनचालकांना कसरत करतच वाहने चालवावी लागतात. येथून कसे चालायचे तेच पादचाऱ्यांना समजत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना रस्त्याने चालताना सुरक्षित वाटत नाही. वाहतूक पोलिसांचे अनधिकृत वाहनतळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते आहे. तसेच वाहतूक पोलिसांकडून अनधिकृत वाहनतळांवर कारवाई होत नाही.

महापालिका आणि वाहतूक पोलीस अनधिकृत वाहनतळांवर संयुक्तरीत्या कारवाई करु शकतात. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून अधिकृत वाहनतळांच्या जागा निश्चित केल्या गेल्या पाहिजेत. तशा निश्चित झाल्या नसतील तर महापालिकेने तसे पत्र दिल्यास आम्ही अनधिकृत वाहनतळावर कारवाई करु.  -राजेंद्र भामरे, सहायक पोलीस उपायुक्त, पिंपरी

 

उड्डाणपूलदेखील अतिक्रमणाच्या विळख्यात

पिंपरी : शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आले असले तरी महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे हे उड्डाणपूलच अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे उड्डाणपुलांखाली सुरु असलेले उद्योग जोरात आहेत. काही भागातील उड्डाणपूल वेश्याव्यवसायाचा आधार बनत चालले असल्याने हे प्रकार वेळीच रोखले जावेत अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

िपपरी चिंचवड महापालिकेने शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी स्वतंत्र वाहतूक कक्ष सुरु केला आहे. शिवाय अतिक्रमण विभागही कार्यान्वित आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने पिंपरीतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक शाखेला स्वतंत्र सहायक पोलीस उपायुक्त दर्जाचे पद दिले आहे. मात्र, या दोन्ही प्रशासनांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे शहरातील उड्डाणपुलांखाली सुरु असलेले बेकायदेशीर उद्योग दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील कोणत्याही उड्डाणपुलाच्या खालची जागा अतिक्रमणमुक्त नाही. प्राधिकरणाने डांगे काळेवाडी फाटा ते डांगे चौकादरम्यान बांधलेल्या समांतर उड्डाणपुलाखालून बीआरटीचा मार्ग केला आहे. त्या मार्गाच्या बाजूने अनधिकृत वाहनतळ सुरू करण्यात आला असून तेथे रिक्षा, टेम्पो ही वाहने लावली जातात. तसेच पुलाशेजारील व्यावसायिकांची चारचाकी वाहनेही याच ठिकाणी लावलेली असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरीही कोणतीही कारवाई केली जात नाही.

महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस विभाग संयुक्तपणे या अनधिकृत वाहनतळांवर कारवाई करु शकतात. मात्र, त्यांच्याकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. उड्डाणपुलांखाली वाहने लावताना चालकांकडून रस्ता ओलांडताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. उड्डाणपुलांखाली सुरु असलेली अतिक्रमणे आणि अनधिकृत वाहनतळांवर कारवाई केली नाही तर हा प्रश्न अधिक व्यापक होईल, याकडेही नागरिकांनी लक्ष वेधले आहे.

‘लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले..

  • भोसरी उड्डाणपुलाखाली चारचाकी आणि दुचाकींचे अनधिकृत वाहनतळ
  • चिंचवड उड्डाणपुलाखाली व्यावसायिक वाहनांचे अनधिकृत वाहनतळ
  • पिंपरी उड्डाणपुलाखालील जागा छोटय़ा व्यवसायिकांनी व्यापली
  • पिंपरी उड्डाणपुलाखाली झोपडपट्टीत घरे बांधून भाडय़ाने देण्याचे प्रकार
  • काळेवाडी फाटा येथील प्राधिकरणाच्या उड्डाणपुलाखाली रिक्षा, चारचाकी वाहनांचे वाहनतळ
  • कुदळवाडी उड्डाणपुलावर अनधिकृतपणे ट्रक उभे केले जातात
  • थेरगांव डांगे चौकात उड्डाणपुलाखाली भाजी बाजार