पुणे वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या अ‍ॅपचा दररोज अडीच ते तीन लाख नागरिक वापर करीत आहेत. हे अ‍ॅप वापरणे अधिकाधिक सोईचे जावे म्हणून अ‍ॅपमध्ये आणखी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून शहराच्या ट्रॅफिकची स्थिती जाणून घेण्यासाठी या अ‍ॅपमध्ये सर्वाधिक ‘लाइव्ह ट्रॅफिक’ या कार्यप्रणालीचा सर्वाधिक वापर केला जात आहे. त्याची माहिती अधिक सुस्पष्टपणे मिळावी म्हणून अ‍ॅपमध्ये पुणे शहराचा नकाशा थ्री-डीमध्ये देण्यात आला आहे.
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी व पुणेकरांना वाहतुकीसंदर्भात माहिती मिळावी म्हणून वाहतूक पोलिसांनी ‘पुणे ट्रॅफिक अ‍ॅप’ नावाचे अ‍ॅप्लिकेशन जुलै महिन्यात सुरू केले आहे. देश आणि विदेशातसुद्धा या अ‍ॅप्लिकेशनला चांगली पसंती मिळत आहेत. आतापर्यंत ४३ हजार नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून दररोज अडीच ते तीन लाख वेळा याचा वापर केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत तीन हजार नागरिकांनी या अ‍ॅपला फाइव्ह स्टार रेटिंग दिले आहे. या अ‍ॅपमध्ये वाहतुकीबरोबच आत्पतकालीन सेवेसाठी लागणारे क्रमांक, पोलीस ठाण्याची माहिती, नियमभंग केल्यानंतर द्यावा लागणाऱ्या दंडाची माहिती, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे क्रमांक, वाहतुकीची चिन्हे, लाइव्ह ट्रॅफिक, रस्ता सुरक्षेसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
याबाबत अ‍ॅप बनविणाऱ्या हार्डकॅसल जीआयएस सोल्युशन कंपनीचे संचालक स्वप्निल जाधव यांनी सांगितले, की या अ‍ॅपमध्ये आतापर्यंत तीन वेळा अपडेट करण्यात आले आहे. या अ‍ॅपममध्ये नागरिकांकडून सर्वाधिक लाइव्ह ट्रॅफिक याचा वापर केला जातो. नागरिक घरातून बाहेर पडताना लाइव्ह ट्रॅफिकद्वारे कोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे, कुठे जॅमिंग झाले हे पाहून कोणत्या रस्ताने जायचे याचा निर्णय घेतील. यामध्ये आता नागरिकांना ही माहिती अधिक सुटसुटीतपणे दिसावी म्हणून शहराचा नकाशा थ्री-डीमध्ये टाकण्यात आला आहे. त्याबरोबरच एखादा पोलीस अधिकारी बदलला तर त्याचा क्रमांक अपडेट केला की त्याची माहिती लगेच अ‍ॅप डाऊनलोड केलेल्यांना तत्काळ मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच, शहरात करण्यात येणारे नो-पार्किंग, वाहतूक बदल याबाबत दिल्या जाणाऱ्या नोटीस सुद्धा अ‍ॅपवर टाकल्या जात आहेत. त्याला नागरिकांची चांगली पसंती मिळत आहे. जास्तीत जास्त मोबाइल धारकांपर्यंत हे अ‍ॅप पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रिक्षांसंदर्भात तक्रारी नोंदविण्याची सोय
रिक्षा चालकाने भाडे नाकारले, एखाद्या वेळी रिक्षा चालक भाडे जास्त घेतल्याच्या अनेक तक्रारी येतात. पण, आता अशा तक्रारी नोंदविण्यासाठी पुणे ट्रॅफिक अ‍ॅपमधील ‘अ‍ॅटो फेअर’ या कार्यप्रणालीमध्ये रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारी नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी जाऊन नागरिक रिक्षाच्या क्रमांकासह तक्रारी नोंदवू शकतात, अशी माहिती स्वप्निल जाधव यांनी दिली.

‘‘पुणे ट्रॅफिक अ‍ॅप हे वापरण्यास फारच सुटसुटीत आहे. यामुळे शहरातील चौकी, पोलीस ठाण्यांची माहिती मिळते. यामध्ये लाइव्ह ट्रॅफिक ही कार्यप्रणाली फारच उपयोगी असून त्यामुळे आपल्याला जायचे असलेल्या रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज येतो. एखाद्या ठिकाणी गर्दी असेल, तर तो मार्ग टाळून इतर मार्गाचा वापर करता येतो. त्याबरोबर एकदा मॉडर्न कॉलेजजवळून भावाची गाडी उचलण्यात आली. त्या वेळी कुठे जायचे हे अ‍ॅपवरूनच समजले.’’
– अखिलेश सक्सेना, पुणे ट्रॅफिक अ‍ॅप वापरणारे नागरिक