कर्वेनगर चौकातील रखडलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून पाणंद रस्ता, डॉ. आंबेडकर चौक येथेही सातत्याने वाहतुकीच्या समस्या उद्भवत आहेत. या समस्यांची पाहणी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली. कर्वेनगर भागातील नागरिकांनी केलेल्या सूचनाही त्यांनी या वेळी विचारात घेतल्या.

कर्वेनगर भागात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. तेथील वाहतूक कोंडीतून नागरिक आणि विद्यार्थी मार्ग काढतात. येथील वाहतुकीच्या समस्येचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे या भागाला भेट देऊन पाहणी करण्याची विनंती भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी डॉ. मुंढे यांना केली होती. त्यानुसार त्यांनी कर्वेनगर भागाची पाहणी केली. नागरिकांनी केलेल्या सूचना त्यांनी ऐकल्या. तसेच पोलिसांच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले. या प्रसंगी माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, शिक्षण मंडळाच्या सदस्य मंजुश्री खर्डेकर, विभीषण मुंडे, नंदकुमार घाटे, दत्ताजी देशमुख, दीपक राव, ॠषीकेश साळी, जगदीश डिंगरे, कर्वेनगर स्त्री शिक्षण संस्थेचे मुकुंद जोशी, संचालक किरण बराटे, श्रीपाद कुलकर्णी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहायक निरीक्षक महेशकुमार सरतापे उपस्थित होते.

कर्वेनगर ते राजाराम पूल दरम्यानचा पाणंद रस्ता विकास आराखडय़ात वीस मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव आहे. या रस्त्याची रुंदी कमी केली जाऊ नये, अशी मागणी मेंगडे यांनी केली. मुंढे म्हणाले, की कर्वेनगर भागातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागृती करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.

कर्वेनगरमधील नागरिकांच्या सूचना

  • कर्वेनगर शिक्षण संस्था ते कॅनॉल रस्त्यापर्यंत बॅरिेकेट्स लावणे
  •  शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात वाहतूक वॉर्डन नेमावेत
  • पाणंद रस्त्यावर सम-विषम तारखांना पार्किंग करावे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक बेटाची पुनर्बाधणी करावी
  • वनदेवी चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करावेत
  •  पथारीवाले व भाजीविक्रेत्यांना रस्त्यावर सामान ठेवू देऊ नये