स्मार्ट सिटीतील उपक्रम पायाभूत सुविधांच्या मुळावर

शहराला समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे यासाठी आग्रह धरणाऱ्या आणि त्यासाठी घाईगडबडीत दोनशे कोटींचे कर्जरोखे उभारणाऱ्या आयुक्तांच्या कार्यपद्धतीतील दुजाभाव समान पाणीपुरवठा योजनेतील अंमलबजावणीच्या निमित्ताने पुढे आला आहे. बालेवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असतानाही समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत या परिसरात उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे थांबवून तेथे स्मार्ट सिटी अंतर्गत ‘ट्रान्सपोर्ट हब’ उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या साठवणूक टाक्यांच्या उभारणीचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत बालेवाडी जकात नाका येथे दहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचे काम समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सुरु झाले आहे. हे काम वेगात सुरु झाले असतानाच ते थांबविण्याची स्पष्ट सूचना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला आयुक्तांनी काही दिवसांपूर्वी दिली. त्यामुळे हे काम अर्धवट टाकून नव्याने जागा शोधण्याची वेळ पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे आयुक्तांनी एका ठिकाणी स्मार्ट सिटीच्या उपक्रमांना ‘महत्त्व’ आणि दुसरीकडे पाणीपुरवठय़ासाठी ‘आग्रह’ अशी दुहेरी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून बालेवाडीतील नागरिकांना मात्र त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. आयुक्तांचा हा निर्णयही वादात सापडण्याची शक्यता आहे.

बाणेर-बालेवाडी भागात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्याबाबत सातत्याने महापालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली असून पाण्याची टंचाई लक्षात घेऊन या भागात बांधकाम करण्यास न्यायालयानेही स्थगिती आदेश दिला आहे आणि महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. साठवणूक टाक्यांच्या उभारणीची कामे निश्चित झाल्यानंतर बालेवाडी परिसरात दहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. बालेवाडी येथे दहा एकर जागेत हा जकात नाका होता. ही जागा महापालिकेकडे गेल्या वर्षी हस्तांतरित करण्यात आली. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सल्लागार कंपनी असलेल्या एसजीआयकडून या भागाचे सर्वेक्षण करण्यात आले आणि या जागेत पाण्याची टाकी उभारण्याचे निश्चित करण्यात आले. टाकी उभारण्याचे काम सुरु झाले असून टाकीचे जोत्याचे बांधकाम करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत ते पूर्ण होणे अपेक्षित असतानाच काम थांबविण्याची सूचना आयुक्तांनी केली.

या जागेवर स्मार्ट सिटी अंतर्गत ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागालाही काम थांबविण्याशिवाय पर्याय राहिला नसून एक एकर जागा शोधण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. बालेवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई, न्यायालयाचे आदेश, महापालिकेने सादर केलेले प्रतिज्ञापत्र याचा विचार करता काम थांबविण्याची आयुक्तांची ही सूचना वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

चर्चा करण्यात येईल

बालेवाडी येथील पाण्याच्या टाकीचे काम थांबवून तेथे ‘ट्रान्सपोर्ट हब’ करण्याच्या कामाबाबत मला कल्पना नाही. पाणीपुरवठय़ासारख्या महत्त्वाच्या योजनांना नेहमीच प्राधान्य राहणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही योजनाही मार्गी लागली पाहिजे. यासंदर्भात पालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. पाणीपुरवठय़ाच्या योजना पूर्ण करण्यासाठीच प्राधान्य राहील, असे कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी  सांगितले.