पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळा बोगद्याजवळ डोंगराला जाळ्या लावण्याच्या कामाकरिता उभारण्यात आलेल्या दगडी भिंतीला बुधवारी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारा एक ट्रक धडकल्याने झालेल्या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर द्रुतगती महामार्गावर व राष्ट्रीय महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी होत तीन किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा घाट व बोगदा परिसरात डोंगराला जाळी लावण्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. हे काम सुरू असताना दगड रस्त्यावर येऊ नयेत म्हणून मुंबई मार्गावरील एक मार्गिका (लेन) बंद करून दगडी सुरक्षा िभत उभारण्यात आली आहे. या भिंतीवर बुधवारी सकाळी एक ट्रक धडकल्याने मुंबई रस्त्यावरील दुसरी मार्गिकाही बंद झाली. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर सुमारे तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही कोंडी कमी करण्यासाठी वळवण येथून मुंबईकडे जाणारी वाहने राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली. त्यामुळे लोणावळा शहरातही वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी सकाळी साडेअकरानंतर सुरळीत झाली. त्यामुळे द्रुतगती व राष्ट्रीय या दोन्ही महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.