भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंदोलन सुरू केले आहे. भूमाता संघटनेच्या नावाचा गैरवापर करण्यात आला असून तृप्ती देसाई यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा भूमाता महिला ब्रिगेडने दिला आहे.
भूमाता या संस्थेची स्थापना डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. शनी शिंगणापूर येथे महिलांना चौथऱ्यावर प्रवेश द्यावा, या मागणीसाठी भूमाता ब्रिगेडने आंदोलन हाती घेतले. मात्र, तृप्ती देसाई यांनी प्रसिद्धीचा हव्यास डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन हाती घेतले. त्यामुळे आम्ही भूमाता ब्रिगेडमधून बाहेर पडून भूमाता महिला ब्रिगेडची स्थापना केली. देसाई यांनी डॉ. बुधाजीराव मुळीक यांची परवानगी न घेता संघटनेच्या नावाचा वापर केला आहे. त्याविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, असा इशारा भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा दुर्गा शुक्रे आणि संघटक अ‍ॅड. कमल सावंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
देसाई यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन केले. कोणाचीही धार्मिक भावना न दुखावता महिलांना समानतेचा अधिकार मिळावा ही आमची मागणी आहे. देसाई यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सोमवारी (७ मार्च) त्र्यंबकेश्वर येथे आंदोलन केले, असा आरोप शुक्रे आणि अ‍ॅड. सावंत यांनी केला.
त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्य़ातील एका गावात दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर गावातील तरुणींनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला आहे. भूमाता महिला ब्रिगेडच्या कार्यकर्त्यां तेथे भेट देणार आहेत. शेतक ऱ्यांच्या समस्या सोडविणे, तसेच विवाहेच्छू तरुणींच्या विवाहासाठी मदत केली जाणार आहे. शनी शिंगणापूर येथे महिलांना चौथऱ्यावर प्रवेश देण्यात यावा, यासाठी ग्रामस्थ आणि विश्वस्तांशी चर्चा केली जाणार आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. महिलांना समानतेचा हक्क मिळावा म्हणून न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे.