तुकाराम मुंढे यांचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

‘जीवनात नेमके काय करायचे याचा निर्णय घेण्यासह प्रत्येक टप्प्यावर आपल्यातील ‘आतला आवाज’ जिवंत ठेवा. जेव्हा कठीण प्रसंग समोर येतात तेव्हा हाच आवाज मार्ग दाखवतो. आपल्यातील चांगले आणि वाईट गुण ओळखा, अजून दहा वर्षांनी आपल्याला आपण कुठे उभे असू असे वाटते त्याचा विचार करा आणि मग त्यासाठी काय-काय करावे लागेल याचा विचार करा,’ असा मूलमंत्र पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला.

‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मार्ग यशाचा’ या दोन दिवसांच्या करीअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या पहिल्या दिवसाचे उद्घाटन गुरुवारी ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.

मुंढे म्हणाले,‘‘आई-वडील त्यांच्या अनुभवाच्या आधारे आणि आपल्या पाल्याच्या हिताचा विचार करून त्यांना करीअर सुचवत असतात. परंतु आपल्याला नेमके काय हवे आहे हे केवळ आपल्याला माहीत असते. त्यामुळे विविध क्षेत्रांविषयी पुरेपूर माहिती घ्या आणि स्वत:चे गुण ओळखून आपल्याला काय करायचे आहे त्याचा निर्णय घ्या. अमूक एक करीअर आपल्याला का करायचे आहे हे ठरवा, ध्येय निश्चित करा आणि त्या क्षेत्रात सवरेत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न आणि प्रचंड कष्ट करा. स्वत:च्या आणि समाजाच्या विकासासाठी आपण काय योगदान देऊ शकू, याचा विचार करा.

मानसिक ताणतणावांच्या दृष्टीने आपले व्यक्तिमत्त्व कसे ओळखावे आणि ताणातून बाहेर पडण्यासाठी विचारप्रक्रिया कशी असावी, याविषयी मानसोपचारतज्ज्ञ  डॉ. रोहन जहागीरदार यांनी ‘खेळ यश-अपयशाचा’ या सत्रात संवाद साधला.  दहावी, बारावी आणि उच्च शिक्षणानंतरच्या करीअरच्या सहसा माहीत नसलेल्या असंख्य वाटांविषयी करीअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी मार्गदर्शन केले. ‘नीट आणि जेईईचं कोडं’ या विषयावर डॉ. अभय अभ्यंकर व डॉ. अतुल ढाकणे यांनी प्रकाश टाकला.

कलात्मकतेची आवश्यकता असलेले जाहिरात क्षेत्र आणि समाज माध्यमांचा करीअर म्हणून वापर याविषयी नामांकित जाहिरात संस्थेचे संचालकऋग्वेद देशपांडे यांनी संवाद साधला.

निवेदन, डबिंग, व्हॉइसओव्हर आणि रेडिओ जॉकी या आकर्षक पर्यायांची ओळख प्रसिद्ध निवेदक डॉ. अमित त्रिभुवन यांनी करून दिली, तर क्रीडा क्षेत्रातील क्रीडा प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, क्रीडा मानसशास्त्रज्ञ, मसाजिस्ट, स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर, क्रीडा समालोचक अशा विविध करीअर संधींबाबत क्रीडा पत्रकार मिलिंद ढमढेरे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व वक्तयांना ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना शुक्रवारीही मिळणार आहे.

प्रायोजक

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेसाठी ‘अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी, मुंबई’ हे टायटल पार्टनर आहेत. ‘विद्यालंकार’ आणि ‘एमआयटी आर्ट डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सटिी, पुणे’ हे असोसिएशन पार्टनर आहेत. सपोर्टेड बाय ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ आणि पॉवर्ड बाय ‘गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करीअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट’ आणि ‘लक्ष्य अ‍ॅकॅडमी, ‘युवर फिटनेस्ट’ हे हेल्थ पार्टनर आहेत.