मोशीमधील देहू फाटा येथे एक लाख रुपय किंमतीचा बारा किलो गांजा एका अल्टो गाडीतून जप्त करण्यात आला. सोमवारी पहाटे पाच वाजता एम.आय.डी.सी भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहू फाटा मोशी येथे पहाटे पाचच्या सुमारास संशयास्पद वाटणाऱ्या अल्टो मारुती कार (एम.एच.-१२.एन.यु.४२१३) तपासणी केली. यावेळी गाडीत बारा किलो गांजा सापडला. याची किंमत ही एक लाख रुपये इतकी आहे. ही कार बोटा (गाव), जिल्हा नाशिक येथून पुण्यातील खेड शिवापूरला चालली होती. पोलिसांनी संबंधीत कार चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. सचिन शिंदे (वय ३१), प्रफुल्ल सुर्वे वय (३०), विकास कोंडे वय (२३) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व खेड शिवापूर येथील राहणारे आहेत. बेकायदा गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांवर एम.आय.डी.सी भोसरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप-निरीक्षक ईश्वर जगदाळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.