थंडीचा शेतीमालावर परिणाम

गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडल्यामुळे फळे तसेच भाजीपाल्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कांदा, लसूण, बटाटा वगळता सर्व भाजीपाल्यांचे दर दहा ते वीस टक्क्य़ांनी वाढले. लिंबू, डाळिंब, खरबूज, पपई, बोरांच्या दरात वीस ते तीस टक्क्य़ांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी राज्य तसेच परराज्यातून मिळून १४० ते १५० गाडय़ा भाजीपाल्याची आवक झाली. गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे, अशी माहिती भाजीपाला बाजारातील प्रमुख विक्रेते विलास भुजबळ यांनी दिली. मध्य प्रदेशातून १७ ते १८ गाडय़ा मटार, राजस्थानातून १० ते १२ गाडय़ा गाजर, आंध्र प्रदेशातून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून ४ ते ५ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ४ ते ५ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून तीन ते साडेतीन हजार गोणी लसूण अशी आवक परराज्यातून झाली, असे भुजबळ यांनी सांगितले.

फळबाजारात फळांची आवक कमी झाली असून लिंबू, डाळिंब, खरबूज, पपई, बोरांच्या दरात वीस ते तीस टक्क्य़ांनी वाढ झाली. अननस, चिक्कू, संत्रा, किनू या फळांचे भाव स्थिर आहेत.

पालेभाज्यांची आवक कमी

पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या शेकडा जुडीमागे तीनशे रुपयांनी वाढ झाली. रविवारी दीड लाख कोथिंबिरीची जुडी आणि पन्नास हजार मेथीच्या जुडीची आवक झाली, अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.