पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली. रविवार पेठ आणि कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
आसिफ इब्राहिम शेख ऊर्फ आसिफ भालदार (वय ३४, रा. रविवार पेठ) आणि कासीम बाशा शेख (वय ३०, रा. साईबाबानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आसिफ भालदार हा सराईत असून त्याच्याविरुद्ध पुणे आणि मुंबई येथे गंभीर स्वरूपाचे सतरा गुन्हे दाखल आहेत. तर कासिम शेख याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत. भालदार आणि शेख यांनी मध्य प्रदेशातून देशी बनावटीची पिस्तुले विकत घेतली होती. भालदार हा बांधकाम व्यावसायिक असून रविवारतो पेठेतील सोन्यामारुती चौकात तर शेख हा कोंढव्यात पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सहायक फौजदार देवीदास भंडारी, नासीर पटेल, आसिफ पटेल, नीलेश पाटील, प्रदीप शितोळे, संतोष पागार, शरद कणसे, दत्तात्रय काटम, राहुल घाडगे, अशोक आटोळे, विनोद साळुंखे यांनी ही कारवाई केली.