बाळासाहेब ठाकरे कलामंदिर सहा महिन्यांत खुले

कोथरूडमध्ये ३८४ आसनक्षमता असलेले छोटेखानी नाटय़गृह आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कायमस्वरूपी दालन असे स्वरूप असलेल्या बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचे काम गतीने सुरू असून सहा महिन्यांत हे कलामंदिर रसिकांसाठी खुले होणार आहे. शेजारीच ८९३ आसनक्षमतेचे यशवंतराव चव्हाण नाटय़गृह असल्याने एकाच प्रांगणात दोन नाटय़मंदिरे असा अभिनव प्रयोग राज्यामध्ये पुण्यात घडणार आहे.

यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाच्या आवारात तीन हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यापैकी दीड हजार चौरस फूट जागेमध्ये छोटेखानी नाटय़गृह उभारण्यात येणार आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये कामास सुरूवात झाली असून त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत १२ कोटी रुपये वापरात आले आहेत. छोटेखानी नाटय़गृहासह पहिल्या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांच्या भाषणांच्या सीडी असे स्वरूप असलेले कायमस्वरूपी दालन असेल. ग्रीन रूम, बुकिंग ऑफिस, मेकअप रूम, रंगीत तालमीसाठी सभागृह, उपाहारगृह, स्वच्छतागृह असे या वास्तूमध्ये असेल. कलामंदिराचे विद्युत, वातानुकूलन यंत्रणा, नाटय़गृहातील खुच्र्या आणि अंतर्गत सजावट ही कामे पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती महापालिकेच्या वारसा वास्तू विभागाचे (हेरिटेज सेल) प्रमुख श्याम ढवळे यांनी सोमवारी दिली. नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नाटय़ परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, समीर हंपी, निकिता मोघे, जादूगार जितेंद्र रघुवीर उपस्थित होते.