अंधश्रद्धेपोटी वन्यजीवांची तस्करी; आठ गुन्हे दाखल

अंधश्रद्धेपोटी वन्यजीव तस्करीचा बाजार पुण्यात तेजीत सुरु आहे. पैशांचा पाऊस पडणे, गुप्तधन सापडणे, व्यवसायात भरभराट होणे अशा अंधश्रद्धेपोटी मांडुळ, कासव या संरक्षित प्राण्यांसाठी लाखो रुपये मोजून त्यांना घरात ठेवले जात आहे. पुण्या-मुंबईतून परदेशात मांडुळ, कासव या प्राण्यांची तस्करी करणारे मोठे जाळे सक्रिय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाखो रुपये मोजून वन्यजीव प्राण्यांची खरेदी केली जाते. यंदावर्षी पुणे पोलिसांनी वन्यजीव प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत आठ गुन्हे दाखल केले असून त्यात सर्वाधिक गुन्हे मांडुळ जातीच्या सर्पाच्या तस्करीचे आहेत.

Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द

कात्रज परिसरात मांडुळ विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पकडले. त्याच्याकडून मांडुळ जातीचा सर्प जप्त करण्यात आला होता. मांडुळाला तस्करांच्या भाषेत ‘डबल इंजिन’ असे सांकेतिक नाव आहे. दुतोंडय़ा असलेल्या मांडुळ जातीचा सर्प अंधश्रद्धेपोटी बाळगला जातो. पुण्या-मुंबईसह देशभरातील इतर शहरांमधूनही मांडुळ जातीच्या सर्पाला मोठी मागणी असते. काळा आणि तपकिरी रंग असलेल्या मांडुळ जातीच्या सर्पाची स्थानिक तस्कर हजारो रुपये देऊन खरेदी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मांडुळ जातीच्या सर्पाची किंमत वजन आणि रंगावरुन ठरते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका सर्पाची किंमत साधारणपणे पाच ते पंधरा लाख रुपये असते, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

कासव बाळगल्याने भरभराट होते, असा अनेकांचा समज आहे. व्यापारी वर्गाकडून तस्करी केलेल्या कासवांची खरेदी केली जाते. कासवांची किंमत नखांवरुन ठरते. साधारणपणे २४ आणि २६ नखे असलेल्या कासवांसाठी मोठी किंमत मोजली जाते. गेल्या काही वर्षांत मांडुळ, कासव या प्राण्यांची मोठय़ा प्रमाणावर तस्करी केली जात आहे. त्यामुळे नामशेष होत चाललेल्या (शेडय़ुल्ड क्लास) प्राण्यांना संरक्षित प्राण्यांचा दर्जा देण्यात आला आहे.

या संदर्भात गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले म्हणाले की, यंदाच्या वर्षी भारती विद्यापीठ, फरासखाना, खडक आणि गुन्हे शाखेकडून केलेल्या कारवाईत मांडुळ जातीचा सर्प, कासव, सर्पविष, वाघाची कातडी, हरणाची कातडी जप्त करण्यात आली आहेत. अंधश्रद्धेपोटी वन्यजीव प्राण्यांची तस्करी करण्यात येते. गुप्तधन सापडणे, पैशांचा पाऊस पडणे अशी अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांकडून काही प्राण्यांना मोठी किंमत मोजली जाते. पोलीस खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली जाते. वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांना पकडण्याची कारवाई पोलीस वनविभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने करतात.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळणारी किंमत

* मांडुळ – पाच ते पंधरा लाख रुपये (वजनानुसार किंमत)

*  कासव- एक लाख ते पाच लाख (नखांनुसार किंमत)

*  वाघाचे कातडे- पाच ते पंधरा लाख

*  सर्पविष- एक कोटी रुपये हरणाचे कातडे- दोन लाख रुपये