महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस यात आणखी भर पडताना दिसते. शहरात मंगळवारी आणखी दोघांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला. निगडीतील ७५ वर्षीय वृद्धाने आणि जुन्नरमधील ५५ वर्षीय व्यक्तीने पिंपरीतील शासकीय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे काल हिंजवडी येथील ६१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता.  गेल्या दोन दिवसात स्वाईन फ्लूने तिघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये स्वाईन फ्लूची धास्ती वाढत आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये जानेवारीपासून आतापर्यत ४३ जण स्वाईन फ्लूमुळे दगावले आहेत. यात ऑगस्टमध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून सप्टेंबरमध्ये सहा जणांनी स्वाईन फ्लूमुळे जीव गमावला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर २४ रुग्ण हे स्वाईन फ्लूने बाधित आहेत. सर्दी, खोकला, ताप हे लक्षण आढळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘टॅमी फ्लू’च्या गोळ्या घ्याव्यात. त्याचबरोबर प्रतिबंधक लस घ्यावी, नागरिकांनी गर्दीमध्ये जाणे सहसा टाळावे, तोंडाला रुमाल बांधावा, असे आवाहन वायसीएम रुग्णालयातील डॉ.लक्ष्मण गोफने यांनी केले आहे.