मोबाइल संभाषण व मुलांशी मैत्रीवरून पालकांच्या तंबीमुळे कृत्य

मोबाइलवरील संभाषण आणि मुलांसोबत बोलत असल्याने पालकांनी तंबी दिल्यानंतर भवानी पेठेतून बेपत्ता झालेल्या तीन शाळकरी मुलींपैकी दोघींनी मुठा कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी उघड झाले. आणखी एक मुलगी अद्यापही बेपत्ता असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत मात्र, रात्री उशिरापर्यंत तिचा ठावठिकाणा लागला नाही.

श्रुती दिगंबर वाघमारे (वय १५), अबेदा मुकमान शेख (वय १३) या मुलींचे मृतदेह कालव्यात सापडले. मुस्कान इम्तियाज मुलाणी (वय १४, तिघी रा. कासेवाडी, भवानी पेठ) ही मुलगी अद्याप बेपत्ता आहे, अशी माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी दिली. आझम कॅम्पस परिसरातील अँग्लो उर्दू शाळेत अबेदा आणि मुस्कान अनुक्रमे आठवी आणि नववीत शिकत होत्या. तर श्रुती एका लष्कर भागातील एका महाविद्यालय अकरावीत शिकते. गुरुवारी (२९ सप्टेंबर) या मुली घरी परतल्या नाहीत. त्यामुळे पालकांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यानच्या काळात कालव्यालगत गोळीबार मैदान येथे शाळेचे दफ्तर व चपला सापडल्या. त्यामुळे हडपसर आणि वानवडी पोलिसांना कालव्यालगतच्या भागाची पाहणी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. बेपत्ता     झालेल्या मुलींनी कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. दप्तरात सापडलेल्या मोबाइलमधील क्रमांकावरून पोलिसांनी मुस्कानच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. शुक्रवारी सायंकाळी वानवडी आणि हडपसर भागात अबेदा आणि श्रुतीचा मृतदेह कालव्यात सापडला. तिघी जणी मोबाइलवर संभाषण करत असल्याने त्यांच्या पालकांनी तंबी दिली होती तसेच मुलांसोबत मैत्री करू नको, असेही त्यांना बजावण्यात आले होते.

दरम्यान, पालकांनी रागवल्यामुळे दोन महिन्यांपूर्वीही चंदननगर भागात अशीच घटना घडली होती. त्या वेळी दोन मुलींनी नदीपात्रात आत्महत्या केली होती.