पुण्यात हेल्मेटसक्तीवरून राजकारण सुरू असतानाच विश्रांतवाडी येथे शनिवारी रात्री भरधाव मोटारीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर मार लागून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
विश्रामवाडीमध्ये शनिवारी रात्री एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराने हेल्मेट घातलेले नसल्यामुळे डोक्याला मार लागून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, हा दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला तेव्हा त्याच्या शरीरावर डोक्याचा भाग वगळता अन्यत्र कुठेही इजा झालेली नव्हती. पण, हेल्मेट न घातल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावरून हेल्मेटसक्ती किती गरजेची आहे, हे अधोरेखित होते.
दुचाकी चालवणारा चालक आणि मागे बसणारा दोघांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती शनिवारपासून राज्यभरात लागू करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राज्याच्या परिवहन आयुक्तांनी सांगितले. पण, राजकीय नेते या हेल्मेट सक्तीला विरोध करत असून यासाठी पुण्यात आंदोलने सुरु आहेत.