अंदमान येथे होणाऱ्या चौथ्या विश्व साहित्य संमेलनामध्ये ‘मला उमगलेले सावरकर’, ‘कारागृहातील साहित्य’ आणि ‘शतजन्म शोधताना’ या कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ५ सप्टेंबर रोजी संमेलनाचे उद्घाटन होणार असून ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
सेल्यूलर जेलसमोरील सावरकर पुतळ्यापासून सकाळी साडेसात वाजता सुरू होणाऱ्या ग्रंथदिंडीची महाराष्ट्र मंडळ कार्यालय येथे सांगता होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास अंदमान-निकोबारचे लेफ्टनंट गव्हर्नर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) ए. के. सिंह, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, स्वागताध्यक्ष खासदार राहुल शेवाळे उपस्थित राहणार आहेत. सावरकरांच्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकावर आधारित ‘गाऊ त्यांना आरती’ हा कार्यक्रम होणार असून त्याचे संहितालेखन डॉ. गणेश राऊत यांनी केले आहे. दुपारच्या सत्रात ‘मला उमगलेले सावरकर’ या विषयावरील परिसंवादात अथर्व देसाई, राहुल रामपूरकर, राहुल मोहिते, अिजक्य अपके आणि मानसी देवधर या चाणक्य मंडलच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर सायंकाळी होणाऱ्या चर्चासत्रात प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे, चित्रकार रविमुकुल आणि अभिनेते दीपक करंजीकर यांचा सहभाग आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सोमवारी दिली.
‘समाजसुधारणा आणि विज्ञाननिष्ठा’ या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ६ सप्टेंबर रोजी चर्चासत्र होणार आहे. त्यानंतर ‘कारागृहातील साहित्य’ या अंतर्गत होणाऱ्या परिसंवादात डॉ. सदानंद मोरे (लोकमान्यांचे गीतारहस्य), मोहिनी मोडक (विनोबांची गीताई), अ‍ॅड. राज कुलकर्णी (पंडित जवाहरलाल नेहरुंचे कारागृहातील साहित्य) आणि दुर्गदीपसिंह चौहान (सेल्यूलर जेलमधील साहित्य) यांचा सहभाग आहे.
भाषाविषयक चळवळी या विषयावर परिसंवाद, ‘मी विनायक दामोदर सावरकर’ हा योगेश सोमण यांचा एकल नाटय़ाविष्कार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकतर्फे ‘शतजन्म शोधतना’ हे कार्यक्रम होणार आहेत, असेही वैद्य यांनी सांगितले.