शेठ चिमणलाल गोविंदास मेमोरियल ट्रस्टच्या उद्यम पुरस्काराचे कसमळकर, शहा मानकरी; सुंदरगिरी महाराज, बस्तू रेगे यांना सेवागौरव पुरस्कार
शेठ चिमणलाल गोिवददास मेमोरिअल ट्रस्टतर्फे सॉफ्टवेअर क्वालिटी सिस्टिम्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गिरींद्र कसमळकर आणि रमेश डाईंगचे गिरीश शहा व मििलद शहा यांना उद्यमगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, तर पुसेगाव (जि. सातारा) येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे सुंदरगिरी महाराज आणि संतुलन पाषाण शाळेचे बस्तू रेगे यांना सेवागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारांची निवड केली. पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे महासंचालक अनंत सरदेशमुख, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम भुर्के यांचा या समितीमध्ये समावेश होता. कसमळकर यांना उद्योग क्षेत्रातील, शहा बंधू यांना व्यापार क्षेत्रातील उद्यमगौरव पुरस्कार तर, सुंदरगिरी महाराज यांना सामाजिक क्षेत्रातील आणि रेगे यांना शैक्षणिक क्षेत्रातील सेवागौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रत्येकी १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिराच्या सभागृहामध्ये रविवारी (३ जुलैे) सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ‘सार्वकालिक आदर्शाच्या प्रकाशात आजच्या व्यवहाराची वाटचाल’ या विषयावर एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली गेली.