शहरातील सर्व अनधिकृत फ्लेक्स २१ एप्रिलपर्यंत काढून टाकण्याची कार्यवाही करा आणि शहर स्वच्छ करा, असे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात २१ एप्रिलनंतर एकही अनधिकृत फ्लेक्स राहणार नाही, अशी घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी गुरुवारी केली.
शहरातील मुख्य चौकांमध्ये तसेच मुख्य सर्व रस्त्यांसह गल्ली-बोळांमध्ये, पथदिव्यांच्या खांबांवर, झाडांवर अशा ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत, तेथे अनधिकृत फ्लेक्स आणि जाहिरात फलक लावण्याचे प्रकार राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकत्रे तसेच व्यावसायिक संस्थांकडून शहरात मोठय़ा प्रमाणात होत आहेत. त्यामुळे शहराचे मोठय़ा प्रमाणात विद्रूपीकरण होत असल्याने या प्रकारांच्या विरोधात स्वयंसेवी संस्थांनी उच्च न्यायालयामध्ये याचिकाही दाखल केली होती. या बेकायदा फ्लेक्सची गंभीर दखल घेऊन त्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर महापौरांनीही आता फ्लेक्समुक्त पुण्याबाबत पुढाकार घेतला आहे. महापौरांनी शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची बठक घेऊन त्यांना याबाबतच्या सूचना दिल्या.
शहरात २१ एप्रिलनंतर एकही फ्लेक्स दिसता कामा नये अशा कडक सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. शासकीय-निमशासकीय कार्यक्रमांच्या जाहिरातींचे फ्लेक्स लावायचे असतील, तर संबंधित संस्थांनी क्षेत्रीय कार्यालयांकडून परवानगी घेऊन नंतरच फ्लेक्स लावावेत. तसेच महापालिकेचे रितसर शुल्क भरून, परवानगी भरून जाहिराती कराव्यात असे कळवण्यात आल्याचे महापौर म्हणाले. अनधिकृत फ्लेक्सबाबत उच्च न्यायालयाने कडक आदेश दिल्यानंतरही अनधिकृत फ्लेक्सच्या संख्येत घट झालेली नाही. त्यामुळे शहर फ्लेक्समुक्त करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे.
नालेसफाईची कामे १० मेपर्यंत करा
पावसाळ्यापूर्वी करण्याच्या कामांचा आढावाही महापौरांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. प्रत्येक प्रभागातील नालेसफाई १० मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पावसाळी कामांची तयारी लवकर सुरू करावी तसेच त्या दृष्टीने नालेसफाईचे नियोजन करावे असेही सांगण्यात आले आहे. नालेसफाईपूर्वी मोठा पाऊस झाल्यास काम योग्य पद्धतीने करता येणार नाही. त्यामुळे नालेसफाईच्या कामांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या आहेत.