बालेवाडीमधील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळून शुक्रवारी ९ मजूर मृत्युमुखी पडले. इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. या स्लॅबखाली काम करत असलेले मजूर ढिगाऱ्याखाली सापडले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार स्लॅब कोसळल्यामुळे काही मजूर थेट इमारतीवरून खाली फेकले गेले. ८ मजूर घटनास्थळीच तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बालेवाडी परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. हिंजवडी आयटी पार्क बालेवाडीपासून जवळ असल्यामुळे या भागात सदनिकांची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. पार्क एक्स्प्रेस या प्रकल्पातील इमारतीचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. याच इमारतीतील स्लॅब कोसळल्याने तिथे काम करणारे मजूर दगावले. या मजुरांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. ही इमारत बांधणाऱ्यांकडे आवश्यक परवानग्या होत्या का, याची माहिती घेण्यात येईल. तसेच यापुढे अशा दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
इमारतीचे बांधकाम करताना सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या का, याचा तपास करण्यात येणार आहे.