मराठी पुस्तके वाचनाची आवड वाढत असली तरी पुस्तकांची संख्या वाढत गेल्यानंतर ती घरात कशाप्रकारे ठेवायची असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांच्या घरात अनेक वर्षांपासून पुस्तके पडून असतात. अशा पुस्तकांचे काय करायचे हाही प्रश्न असतो. अशी पुस्तके वाचनालयांपर्यंत, जिज्ञासू वाचकांपर्यंत आणि वाचनप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा आगळा उपक्रम पुण्यात सुरू झाला असून त्याला साहित्यप्रेमींकडून मिळणारा प्रतिसादही वाढता आहे.

अनेक घरांमधून पुस्तके मोठय़ा प्रमाणावर पडून असतात. त्यांचे मोल लक्षात घेऊन ती जपून ठेवलेली असतात. मात्र अशा पुस्तकांचे काय करायचे हा मोठा प्रश्न अनेकांना पडलेला पडतो. घरातील पुस्तकांची संख्या वाढल्यानंतरही असाच प्रश्न उद्भवतो. त्यामुळे ज्यांना अशी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्याची इच्छा आहे, अशांसाठी पुण्यातील उत्कर्ष बुक सव्‍‌र्हिसचे सुधाकर जोशी यांनी पुस्तक संकलनाचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची माहिती ज्यांना ज्यांना समजत आहे त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून पुस्तके चांगल्या संख्येने संकलित होत आहेत, असे जोशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पुस्तकविक्री आणि मराठी पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाचा जोशी यांना गेल्या साठ वर्षांचा अनुभव असून पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे ते म्हणाले.

या उपक्रमात ज्यांना पुस्तके देण्याची इच्छा आहे अशांकडील पुस्तके वाचनाची आवड असणाऱ्यांपर्यंत पोहोचवायची या हेतूने हा उपक्रम सुरू झाला असून गोळा होणारी पुस्तके छोटी-मोठी ग्रंथालये, खासगी वाचनालये, सार्वजनिक वाचनालयांना देण्याची योजना आहे.

ज्यांना अशी पुस्तके खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांना अतिशय कमी किमतीत किंवा विनामूल्य देखील पुस्तके दिली जाणार आहेत. पुस्तके योग्यरीतीने पोहोचवण्याची यंत्रणा तयार करणे महत्त्वाचे आहे.

हे लक्षात घेऊन यंत्रणा तयार करण्यात येत असून अधिकाधिक वाचकांपर्यंत ही पुस्तके देणे या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुस्तक संकलनाच्या या उपक्रमाची माहिती ज्यांना होत आहे अशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पुस्तके योग्य वाचकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे या कल्पनेचे स्वागत झाले आहे, असेही जोशी यांनी सांगितले.