युनायटेड किंग्डममधील विद्यापीठे भारतीय विद्यापीठांबरोबर करार करण्यास उत्सुक असून युकेकडून शिक्षण क्षेत्रामध्ये भारतात गुंतवणूक केली जाणार आहे. येत्या काही काळात युकेमधील विद्यापीठे आणि भारतीय विद्यापीठांमध्ये एकत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असे ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर पिटर बेकिंगहॅम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ब्रिटिश शिष्टमंडळाने नुकतीच भारताला भेट दिली. त्या वेळी भारतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याबाबत युकेने भारताशी करार केले. या वेळी बेकिंगहॅम म्हणाले, ‘‘युकेमधील विद्यापीठे भारतीय विद्यापीठांशी करार करण्यास उत्सुक आहेत. केंब्रिज, लंडन ही विद्यापीठेही भारतीय विद्यापीठांबरोबर काम करण्यास उत्सुक आहेत. एकत्रित अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची देवाण-घेवाण, शिष्यवृत्ती अशा विविध गोष्टी शिक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्याने सुरू करण्यात येतील. विशेषत: अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनामध्ये गुंतवणूक करण्यास युके उत्सुक आहे. युकेमधील संशोधन संस्थांकडून भारतात ३ लाख पौंड ( २२ कोटी) ते १०० दशलक्ष (७५ कोटी) रुपयांची गुंतवणूक केली जाईल.’’
शिक्षणाव्यतिरिक्त आरोग्य, सायबर सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांमध्ये युके गुंतवणूक करणार असल्याचे बेकिंगहॅम यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘मुंबई-बंगळुरू आर्थिक पट्टय़ामध्ये होणारा विकासाचा दर लक्षात घेता या पट्टय़ामध्ये गुंतवणूक करण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे यांचाही समावेश आहे. सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत यापूर्वीही भारताबरोबर करार करण्यात आले आहेत. सायबर सुरक्षेबाबत शिक्षण, पायाभूत साधने अशा विविध धर्तीवर युके आणि भारत एकत्रित काम करणार आहेत.’’