सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.. देशांतील एक महत्त्वाचे विद्यापीठ. या विद्यापीठाचे कुलगुरू.. मानाचे, प्रतिष्ठेचे पद.. शैक्षणिक, संशोधन क्षेत्रांत उल्लेखनीय उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मान्यवरांनी या पदाची धुरा सांभाळण्याची परंपरा.. अद्यापही टिकून असलेली. मात्र, तरीही आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू कसे आहेत, त्यांचे काम काय हे जाणून घेण्याची इच्छा कुणाला झाली, तर पदरी निराशाच पडणार आहे. कारण विद्यापीठाकडे कुलगुरूंचा बायोडेटाच नाही म्हणे.
एखाद्या संस्थेत कोणत्याही पदावर एखादी व्यक्ती जेव्हा काम सुरू करते किंवा एखाद्या संस्थेबरोबर काम करण्याची इच्छा दाखवते, तेव्हा प्राथमिक गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा बायोडेटा मागितला जातो. तो बायोडेटा आधारभूत ठेवून व्यक्तीची नियुक्ती केली जाते. आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांची माहिती, त्यांचा बायोडेटा संस्था जपतही असते. विद्यापीठाने मात्र, कुलगुरूंचा बायोडेटा विद्यापीठाकडे उपलब्धच नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांला कुलगुरूंबाबत काही जाणून घ्यायचे असेल, तर त्याच्या पदरी निराशाच येणार आहे.
आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू काय करतात, ते कोण आहेत, कसे आहेत, त्यांनी केलेले संशोधन अशा सगळ्याची माहिती मिळवण्याची इच्छा दशरथ राऊत यांना झाली. मग ही माहिती मिळवायची कशी.. तर त्यासाठी राऊत यांनी माहिती अधिकारांत कुलगुरूंचा बायोडेटा मागितला. मात्र, ‘विद्यापीठाकडे कुलगुरूंचा बायोडेटा उपलब्ध नाही,’ असे उत्तर प्रशासनाने माहिती अधिकारांत दिले आहे. २५ मार्च रोजी हे उत्तर विद्यापीठाने दिले आहे.
विद्यापीठाकडे माहिती मागितल्यानंतर ती माहिती अधिकार कक्षाकडे उपलब्ध नसेल, तर ती संबंधित कक्षाला विचारून अर्जदाराला कळवली जाते. त्यानुसार कुलगुरूंचा बायोडेटा मिळण्याबाबतची माहिती ही प्रशासन विभाग किंवा कुलगुरू कार्यालयाकडून माहिती अधिकार कक्षाला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कुलगुरू कार्यालयाकडूनही माहिती न मिळण्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय विद्यापीठाचे कुलगुरू हे पद सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाचे पद असल्यामुळे कुलगुरूंचा बायोडेटा हा सर्वाना मिळणे किंवा पाहण्यासाठी खुला असणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठाच्या प्रशासनाकडे माहितीच नसेल, तर माहिती अधिकार कक्ष तरी ती कुठून देणार?

माहिती देण्यापेक्षा टाळण्याकडेच कल?
माहिती अधिकारांतर्गत विद्यापीठाकडे विचारण्यात आलेली माहिती देण्याऐवजी ती टाळण्याकडेच विद्यापीठाचा कल असल्याचा आरोप विद्यापीठावर सातत्याने केला जातो. ‘माहिती उपलब्ध नाही, ही माहिती देता येऊ शकत नाही..’ अशीच उत्तरे सातत्याने मिळत असतात. कुलगुरूंचा बायोडेटा देण्यास नकार देणे हा त्यातीलच प्रकार आहे, असे मत एका कार्यकर्त्यांने व्यक्त केले.