सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ अद्याप सुरूच आहे. प्रवेशपत्रे, विद्यार्थ्यांची समरी अद्यापही महाविद्यालयांना मिळालेली नसल्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा खोळंबल्या आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासाठी परीक्षेच्या नियोजनातील गोंधळ नवीन नाहीत. दरवर्षी विद्यापीठाच्या परीक्षांच्या नियोजनात गोंधळ असतोच. या परीक्षेसाठीही परीक्षा विभागाने आपली परंपरा कायम राखली आहे. मार्च – एप्रिलमध्ये होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षांमध्येही गोंधळाची सुरूवात झाली आहे. यावर्षी विद्यापीठाने प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार महाविद्यालयांमध्ये कला आणि वाणिज्य शाखेच्या परीक्षा या ११ मार्चपासून सुरू होणे अपेक्षित होते. वेळापत्रकानुसार तारखा उलटून गेल्या तरीही अनेक महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांचे नियोजन झालेले नाही. वेळापत्रकानुसार द्वितीय आणि तृतीय वर्ष कला शाखेच्या प्रात्यक्षिक परीक्षा १६ ते ३१ मार्च या कालावधीत घेणे अपेक्षित आहे. वाणिज्य शाखेमध्ये द्वितीय वर्षांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा या ११ ते १७ मार्च या कालावधीत तर, तृतीय वर्षांच्या परीक्षा १८ ते ३० मार्च या कालावधीत होणे अपेक्षित होते. मात्र, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून अद्यापही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत, तर महाविद्यालयांनाही समरी मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थी क्रमांकानुसार महाविद्यालयांना परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. आधी विद्यार्थ्यांच्या अनुक्रमांकानुसार परीक्षा घ्यायच्या आणि नंतर ती सर्व माहिती परीक्षाक्रमांकानुसार भरून विद्यापीठाकडे पाठवायची, हे सोपस्कार करण्यापेक्षा महाविद्यालयांनी समरी येईपर्यंत परीक्षा सुरू न करण्याचेच धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आता लेखी परीक्षेच्या तोंडावरच महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांचा गोंधळ होणार आहे.
‘समरी आणि प्रवेशपत्रे आली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांकच कळू शकलेले नाहीत. त्यामुळे परीक्षा घेतली, तरी गुणांची नोंद कशी करायची असा प्रश्न आहे. त्यावर महाविद्यालयातील अनुक्रमांकानुसार परीक्षा घेतल्यास, नंतर निकाल लावणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे प्रवेश पत्रे मिळाल्यावरच परीक्षांचे नियोजन करण्यात येणार आहे,’ असे एका प्राचार्यानी सांगितले.