विद्यापीठ अनुदान आयोगाचे विद्यापीठांना आदेश
विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होऊन तो पदवी घेण्यासाठी पात्र ठरल्यापासून सहा महिन्यांच्या आत त्याला पदवी देण्यात यावी, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना दिले आहेत. विद्यापीठाकडून वेळेवर पदव्या दिल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांना संधी गमवाव्या लागतात, असेही आयोगाने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यापीठांकडून पदवीदान समारंभ आयोजित करून त्यानंतर पदव्या दिल्या जातात. तांत्रिकदृष्टय़ा विद्यार्थी पदवी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर तो पदवी घेण्यासाठी पात्र ठरतो. मात्र तरीही पदवी प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक संधी जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी आयोगाकडे केली होती. अनेक विद्यापीठे वेळेवर पदवी देत नसल्यामुळे नुकसान होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्याचे आयोगाने म्हटले आहे. या पाश्र्वभूमीवर विद्यार्थी पदवी घेण्यासाठी पात्र ठरल्यावर सहा महिन्यांत म्हणजे १८० दिवसांत विद्यार्थ्यांना पदवी देण्यात यावी, असे आदेश आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत. आयोगाच्या २००८ मध्ये काढलेल्या अध्यादेशातही सहा महिन्यांत पदवी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे विद्यापीठाने त्यांच्या परिपत्रकांत नमूद केले आहे. वेळेवर पदवी मिळणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.