सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधन केंद्रांकडून पीएच.डी देताना नियम पाळले जात नाहीतच. मात्र विद्यापीठाचे विभागही नियमांचा भंग करण्यात आघाडीवर आहेत. विद्यापीठाचा शारीरिक शिक्षण विभाग हे या नियमभंगाचे एक उदाहरण. या विभागात पुरेसे मार्गदर्शक नसतानाही विद्यार्थ्यांना सर्रास प्रवेश देण्यात आले आहेत.

पीएच.डी. देण्यासाठी आयोगाने निश्चित केलेले बहुतेक सर्वच नियम विद्यापीठाने मोडले आहेत. पीएच.डी. देताना चालणारे हे गैरप्रकार ‘लोकसत्ता’ने सातत्याने यापूर्वीही प्रकाशात आणले आहेत. मार्गदर्शक, पुरेशा सुविधा नसतानाही विद्यापीठाच्या संशोधन केंद्राकडून विद्यार्थ्यांना पीएच.डीला प्रवेश देण्यात आले आहेत आणि विद्यापीठानेही त्यांना मान्यता दिली आहे. आता विद्यापीठाची संशोधन केंद्रच नाही, तर विभागही नियमांचा भंग करण्यात आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागात पुरेसे मार्गदर्शक नसतानाही विद्यार्थी पीएच.डी करत आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) २००९ च्या नियमावलीनुसार पूर्णवेळ नियमित शिक्षकच पीएच.डीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करू शकतो. एका मार्गदर्शकाला एकावेळी ८ विद्यार्थ्यांनाच मार्गदर्शन करता येते. विद्यापीठाचे संकेतस्थळ आणि विविध अधिकृत स्रोतांमधून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शारीरिक शिक्षण विभागामध्ये सध्या साधारण ४५ विद्यार्थी पीएच.डी करत आहेत. मात्र या विभागात मार्गदर्शक म्हणून काम करणारे बहुतेक प्राध्यापक हे विभागातील पूर्णवेळ नियमित प्राध्यापक नाहीत. काही प्राध्यापक हे अगदी नगर आणि नाशिक जिल्ह्य़ातीलही आहेत. त्यामुळे विभागात संशोधन करणारा विद्यार्थी पुण्यात आणि त्याचे मार्गदर्शक मात्र बाहेरगावी असे चित्र दिसत आहे. याच विभागातील एका प्राध्यापकांची पीएच.डी गेली जवळपास आठ वर्षे सुरू आहे. याबाबत विभागाचे प्रमुख डॉ. दीपक माने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास असमर्थता दाखवली.

रिक्त पदे नसतानाही विद्यार्थी

आयोगाच्या आणि विद्यापीठाच्या नियमानुसार प्रत्येक संशोधन केंद्राने पीएच.डीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी रिक्त जागांचे तपशील जाहीर करायचे असतात. कोणत्या मार्गदर्शकाकडे सध्या किती विद्यार्थी आहेत, किती जागा रिक्त आहेत त्याचे तपशील दिल्यानंतरच त्या मार्गदर्शकाला पीएच.डीसाठी विद्यार्थी दिले जातात. मात्र विद्यापीठाच्या काही विभागांमध्ये मार्गदर्शकांच्या रिक्त जागा जाहीर न करताच त्यांना पीएच.डीचे विद्यार्थी देण्यात आल्याचे दिसत आहे.