गेली काही वर्षे अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पुरेशा सुविधा नसतानाही विद्यापीठाने संलग्नता कायम ठेवली. मात्र आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) कारवाईनंतर विद्यापीठाने या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अभियांत्रिकी शिक्षणाचे केंद्र म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. राज्यातील सर्वाधिक अभियांत्रिकी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. मात्र त्रुटी असलेली महाविद्यालयांची संख्यादेखील विद्यापीठाच्या क्षेत्रात जास्त आहे. गेली दोन वर्षे विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समित्यांनी त्रुटी निदर्शनास आणूनही काही अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यापीठाकडून झुकते माप देण्यात आले. काही महाविद्यालयांची संलग्नता कायम करण्यात येऊ नये, अशा आशयाचा शेरा स्थानिक चौकशी समितीने दिला होता. मात्र तरीही ही महाविद्यालये दोन वर्षे बिनबोभाट सुरू होती. निकषांची पूर्तता करण्याच्या अटीच्या आधारे संलग्नीकरण देण्यात येऊ नये, असे तंत्रशिक्षण विभागाचे आदेश असतानाही विद्यापीठाने त्याला धूप घातली नाही. आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) त्रुटी असलेल्या
महाविद्यालयांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर विद्यापीठ अडचणीत आले आहे. त्यामुळे काही वर्षे वाचवण्याचा प्रयत्न केलेल्या महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या क्षेत्रातील साधारण ११ अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यापीठाने नोटीस दिली असल्याचे समजते आहे. यातील आठ महाविद्यालये शहर आणि परिसरातील आहेत, तर लोणावळा, बारामती आणि नगरमधील प्रत्येकी एक महाविद्यालय आहे. नोटीस दिलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने गरजेपेक्षा मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या कमी आहे. त्याचबरोबर काही महाविद्यालयांबाबत शिक्षकांना वेळेवर वेतन न मिळणे, भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यांमध्ये जमा न करणे अशाही तक्रारी आहेत. काही महाविद्यालयांमध्ये तर प्रयोगशाळा, ग्रंथालय अशा प्राथमिक पायाभूत सुविधांचीही कमतरता आहे. ‘महाविद्यालयाने महाराष्ट्र कायद्यानुसार असलेल्या संलग्नीकरणाच्या अटींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी संलग्नीकरणानुसार प्रदान केलेले अधिकार का काढून घेण्यात येऊ नयेत,’ अशा आशयाचे पत्र विद्यापीठाने या महाविद्यालयांना पाठवले आहे. या महाविद्यालयांना उत्तर देण्यासाठी १ महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

मोठय़ा महाविद्यालयांना सूट?
शिक्षकांची कमतरता, वेळेवर वेतन न देणे अशा विविध तक्रारी अनेक मोठय़ा, नावाजलेल्या संस्थांबाबतही आहेत. त्यांच्यावर तंत्रशिक्षण विभागानेही कारवाई केली आहे. मात्र या महाविद्यालयांवर विद्यापीठाकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. किंबहुना या महाविद्यालयांना संलग्नताही देण्यात आली असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले. एआयसीटीईने सुविधा नसल्यामुळे प्रवेश क्षमता कमी केलेल्या किंवा दुसऱ्या पाळीतील अभ्यासक्रम बंद केलेल्या महाविद्यालयांची संख्या देखील जास्त आहे. विद्यापीठाच्या कक्षेतील साधारण २० ते २२ महाविद्यालयांवर एआयसीटीईने कारवाई केली आहे, असे असताना विद्यापीठाला मात्र अकराच महाविद्यालयांतील त्रुटी कशा दिसल्या, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.