अभिजित शेवाळे – (क्रमांक ९०)
अभिजित हे भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहेत. २०१३ साली त्यांची या पदासाठी निवड झाली होती. दंतवैद्यक क्षेत्रातील शिक्षण (बीडीएस) पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. निपाणी येथील शेतकरी कुटुंबातील अभिजित यांचा हा तिसरा प्रयत्न होता.
महेश लोंढे –  (क्रमांक २५४)
सोलापूर जिल्ह्य़ातील बारलोणी गावचे महेश लोंढे भूमी अभिलेख खात्यात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे. २०१३ साली त्यांची या पदासाठी निवड झाली होती. त्याचप्रमाणे महिला व बालविकास खात्यात सहायक आयुक्त म्हणूनही त्यांची निवड झाली होती. महेश यांनी इंग्रजी साहित्य या विषयात एमए केले आहे. त्यांचे वडील कुर्डूवाडी येथे वकिली व्यवसाय करतात.
राहुल कर्डिले (क्रमांक ४२२)
अभियांत्रिकीची पदवी घेतलेले राहुल कर्डिले हे जिल्हा उपनिबंधक संस्था येथे कार्यरत आहेत. ‘यू.पी.एस.सी. चा  माझा ६ वा प्रयत्न असून मला यावेळी खात्री होती. माझे वडील शिक्षक असल्यामुळे मला आधीपासूनच अभ्यासाची गोडी होती. माझी पत्नीदेखील उपजिल्हाधिकारी आहे. आम्ही मिळूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करत होतो. पुढे चांगले कार्य करण्याची इच्छा आहे,’ असे राहुल यांनी सांगितले.
अक्षय हाके (क्रमांक ५०८)
अक्षय हाके हे सध्या भारतीय व्यापार सेवेतकार्यरत आहेत. यापूर्वी त्यांची डिफेन्स अकाउंट या सेवेसाठी निवड झाला होती. मनमाड येथील अक्षय हे संगणक अभियंता आहेत. त्यांचे आई-वडील दोघेही मनमाड येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. यंदाचा त्यांचा हा तिसरा प्रयत्न असल्याचे अक्षय यांनी सांगितले
राजेश मुंडे (क्रमांक ७३८)
वरचा क्रमांक मिळावा यासाठी पुढच्या परीक्षेची तयारीही सुरू केली असल्याचे नांदेड येथील राजेश मुंडे यांनी सांगितले. ‘कुठली ही शिकवणी न लावता मी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली याचा मला आनंद होत आहे. हा माझा पाचवा प्रयत्न होता. दिल्लीतील स्पर्धा परीक्षांच्या वातावरणाबद्दल खूप ऐकले होते. त्या मुळे यावेळी दिल्ली येथे जाऊन तयारी करायची ठरवले होते. तिथे देखील मी कुठलीही शिकवणी लावली नाही,’ असे राजेश यांनी सांगितले.
सचिन घागरे (क्रमांक ८४०)
सचिन घागरे हे औरंगाबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकी शाखेतून पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. ‘लहानपणापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा होती. मात्र, हातात अजून एखादा पर्याय असावा म्हणून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. वरची रँक मिळवण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे,’ असे सचिन यांनी सांगितले.