उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ मागील १३ दिवसापासून तेथील कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच शहरातील कचरा समस्येबाबत मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. या भेटीत फडणवीसांनी त्यांना पुन्हा चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील कचरा प्रश्न पालकमंत्री गिरीश बापट, प्रशासन आणि ग्रामस्थाशी पुन्हा चर्चा करून सोडवा.असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या विधानामुळे मुख्यमंत्र्यांनी कचरा प्रश्नावरून हात झटकल्याची चर्चा रंगताना दिसत आहे.

यानंतर कचरा प्रश्नाबाबत आज पुणे महापालिकेत एक बैठक झाली. महापौर मुक्ता टिळक,उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे,शिवसेना गटनेते संजय भोसले,अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप,घनकचरा व्यवस्थापन प्रमुख सुरेश जगताप तसेच अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. तब्ब्ल एक तास चर्चा करण्यात आली.  या बैठकीविषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, शहरातील कचरा मार्गी लावण्यासाठी मागील १३ दिवसापासून उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांशी अनेक वेळा चर्चा करण्यात आली आहे. मात्र, कचरा टाकू देणार नाही, या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत. ग्रामस्थाचा पवित्रा लक्षात घेता. कचरा प्रश्न सुटणे अशक्य असल्यामुळे यापुढील कचरा शहरातील छोट्या छोट्या प्रकल्पात झिरविण्यात येणार आहे.

पुणे शहरातील कचरा प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. ९ महिन्यात तेथील कचरा प्रश्न मार्गी लावू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बैठकीत केली होती, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा मुद्दा मांडला होता. महापौरांनी मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर सारवासारव केल्याचे दिसले. कचरा डेपोत ७५० टन क्षमतेचा प्रकल्प उभारला जाईल. त्यातून समस्या सुटण्यास मदत होईल, असे त्यांनी जाहीर केले होते.असे त्या म्हणाल्या आहेत. उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या विरोधामुळे शहरातील कचरा प्रश्न भीषण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह आठ ही आमदारांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही.