‘‘केवळ शाश्वत ऊर्जेचाच वापर नव्हे, तर पुनर्वापर करण्याजोग्या शाश्वत पदार्थाच्या वापरावरही भर देणे आवश्यक आहे. व्यक्तिगत पातळीवर शाश्वत ऊर्जेचा वापर सुरू व्हावा यासाठी टप्प्याटप्प्याने बदल सुचवले गेल्यास ते प्रत्यक्षात येऊ शकतील,’’ असे मत ‘समुचित एन्व्हायरो टेक’ या कंपनीच्या संचालक प्रियदर्शिनी कर्वे यांनी व्यक्त केले. किलरेस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
कर्वे म्हणाल्या, ‘‘स्टील, सिमेंट अशा अशाश्वत पदार्थाच्या ऐवजी फ्लाय अॅशच्या विटा किंवा सेंद्रिय प्लॅस्टिक अशा नवनव्या पदार्थाचा वापर करता येऊ शकेल. मोठय़ा प्रमाणावर बटाटय़ाचे वेफर्स तयार करण्याच्या प्रक्रियेत बाहेर टाकल्या जाणाऱ्या पाण्यातील स्टार्च वापरून सेंद्रिय प्लास्टिकची निर्मिती करता येते. हे प्लॅस्टिक पेट्रोलियम प्लॅस्टिकपेक्षा खर्चिक असते. परंतु पेट्रोलियम प्लॅस्टिकमुळे पर्यावरणावर होणाऱ्या विपरित परिणामांचा भरुदड त्याच्या उत्पादनावर लावला गेल्यास सेंद्रिय प्लॅस्टिकचा उत्पादन खर्च कमी करता येईल. घरात ग्रीडच्या विजेचा वापर पूर्ण बंद करण्यापेक्षा दररोज किमान दोन तास केवळ सौर दिवे वापण्यासारखे लहान बदल लवकर अंगीकारले जाऊ शकतील.’’

‘सागरी जैवविविधतेसाठी
धोरणे व स्वतंत्र खाते हवे’
‘‘जैवविविधताविषयक धोरणांच्या आखणीत ‘सागरी जैवविविधता’ हा दुर्लक्षित मुद्दा आहे. सागरी जैवविविधतेचे रक्षण ही वनखात्याची जबाबदारी असली तरी या जैवविविधतेसाठी वेगळ्या प्रकारे अभ्यास करण्याची गरज असल्यामुळे त्यासाठी स्वतंत्र धोरणे आणि स्वतंत्र खात्याची आवश्यकता आहे,’’ असे मत ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’च्या संवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ. दीपक आपटे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘कोकण किनारपट्टीवर पुढील दहा वर्षांत १५ ऊर्जानिर्मिती केंद्रे उभी राहणार आहेत. ऊर्जानिर्मिती केंद्रांमधून समुद्रात सातत्याने मोठय़ा प्रमाणावर गरम पाणी सोडले जाते. समुद्री जीव पाण्याच्या तापमानाला खूप संवेदनशील असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून १० फॅदमपर्यंतच्या मासेमारीच्या पट्टय़ातील जैवविविधतेवर मोठे परिणाम शक्य आहेत. किनारी भागात जेथे ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’  होणार आहे तिथल्या संभाव्य परिणामांचा संकलित विचार होणे आवश्यक आहे.’’