वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये एसपीजी गॅस वितरकांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली असून, त्यात गॅस सिंलिंडरबाबत वेगवेगळे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. विभागाच्या वतीने या मोहिमेत वेगवेगळ्या प्रकरणात ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वितरकाकडून ग्राहकाला गॅस सिलिंडर देताना प्रत्यक्षात त्याचे वजन करून देणे बंधनकारक आहे. मात्र, काही वितरकांकडून या नियमाची अंमलबजावणी केली जात नाही. सिलिंडरमध्ये गॅस कमी मिळत असल्याच्याही तक्रारी ग्राहकांकडून वेळोवेळी करण्यात येत असतात. वितरणापूर्वी सििलडरमधून गॅस काढून घेण्याच्या प्रकाराबाबत मागील महिन्यात शहरात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर वैधमापन शास्त्र विभागाच्या वतीने तपासणीची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वैध मापनच्या जिल्ह्यातील सर्व निरीक्षकांनी सहभाग घेऊन तपासणी केली.

वैध मापन शास्त्र कायद्यांतर्गत आणि आवेष्टित वस्तू नियमांतर्गत या मोहिमेमध्ये ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वितरणाच्या वेळी ५० किलोग्रॅम क्षमतेचे तोलन उपकरणे ग्राहकांना उपलब्ध न करून देणे, दिलेल्या मुदतीत पडताळणी व मुद्रांकन करून न घेताच तोलन उपकरणे वापरणे या स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. वितरणासाठी उपलब्ध असलेल्या गॅस सिंलिंडरची वजनाच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली.

त्यामध्ये ग्राहकांना कमी वजनाचा सिंिलडर दिल्याचे दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, अशी माहिती वैधमापन शास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक द. ग. महाजन यांनी दिली. वैधमापन नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयाच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.