मुंबईत महापालिका शाळांसह सर्व अनुदानित शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने मान्य केल्याच्या पाठोपाठ तसाच प्रस्ताव पुणे महापालिकेलाही देण्यात आला आहे. शिवसेनेच्या नगरसेवकाने स्थायी समितीला हा प्रस्ताव दिला आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या नगरसेवकाने मांडलेल्या ठरावाला शिवसेनेने मंजुरी दिल्यानंतर पुण्यात मात्र शिवसेनेच्या नगरसेवकाने असा प्रस्ताव दिल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष त्याबाबत काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. ‘देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील प्रेरणादायी ठरलेले आणि प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारे ‘वंदे मातरम्’ हे गीत महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये गायले जावे आणि सर्व शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र बसविण्यात यावे,’ असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये आठवडय़ातून दोन वेळा वंदे मातरम् सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मुंबई महाापलिकेकडून मान्य करण्यात आला होता. मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर पुण्यातील नगरसेवकांनीही तसा प्रस्ताव दिला आहे. महापालिकेच्या ३१० शाळा आहेत. मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड माध्यमाच्या या शाळा असून या सर्व शाळांमध्ये जवळपास एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे करण्यासंदर्भात महापालिकेच्या विधी विभागानेही सावध भूमिका घेतली आहे. यासंदर्भात कायद्यातील तरतुदींचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यामुळे शाळांचे नियंत्रण महापालिका प्रशासनाकडे आले आहे. त्यामुळे हा निर्णय घ्यायचा झाल्यास महापालिकेच्या मुख्य सभेची त्याला मंजुरी लागेल, असा दावाही महापालिकेच्या विधी विभागातील अधिकाऱ्यांनी केला.