सध्या सुरू असलेल्या डेंग्यूच्या साथीच्या तीव्रतेविषयी शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांकडून वेगवेगळी निरीक्षणे नोंदवली जात आहेत. डेंग्यूची पावसाळी साथ फारशी तीव्र नसल्याचे काही तज्ज्ञांचे निरीक्षण असले, तरी काही रुग्णांमध्ये डेंग्यूत होणारी कावीळ, तसेच प्लेटलेट काऊंट झपाटय़ाने खाली जाणे हेही पाहायला मिळत आहे.
डेंग्यूच्या दहापैकी चार रुग्णांमध्ये प्लेटलेट काऊंट घटणे दिसत असल्याचे चिंतामणी रुग्णालयाचे डॉ. सचिन यादव यांनी सांगितले. ते म्हणाले,‘५ ते ६ दिवस राहणारा तीव्र ताप, उलटय़ा आणि यकृताला सूज येणे अधिक रुग्णांमध्ये दिसत आहे. ‘लिव्हर एन्झाइम्स’ची नेहमी दिसणारी पातळी साधारणत: ‘४० आय.यू.’ (इंटरनॅशनल युनिट) एवढी असते. डेंग्यूमध्ये होणाऱ्या सौम्य काविळीत ती २०० पर्यंत वाढू शकते. परंतु सध्या काही डेंग्यूरुग्णांमध्ये लिव्हर एन्झाइम्सची पातळी ६०० ते १००० आय. यू. इतकी वाढलेली सुद्धा दिसून येत आहे. काही रुग्णांमध्ये प्लेटलेट काऊंट झपाटय़ाने घटतो आहे. प्लेटलेट २० हजारच्या खाली जाणे सर्रास बघायला मिळत असून त्यामुळे लोक घाबरुन जात आहेत, अशा रुग्णांवर देखरेख ठेवणे गरजेचे असते. ’
मागील साथीपेक्षा सध्याची डेंग्यूची साथ सौम्य असून अधिक रुग्णांना प्लेटलेट देण्याची गरज भासत नसल्याचे निरीक्षण रुबी हॉल रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. प्राची साठे यांनी नोंदवले. त्या म्हणाल्या,‘प्लेटलेट काऊंट घटत असल्याचे पाहून रुग्ण घाबरुन जाऊन प्लेटलेट भरण्याचा आग्रह धरतात आणि त्यांना समजावणे काही वेळा अवघड होऊन बसते. अशा वेळी आम्हाला ठाम राहावे लागते. साथ सौम्य असली तरी डेंग्यूरुग्णाने डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे, दर एक दिवसाआड प्लेटलेट काऊंट तपासणे हे आवश्यक आहे.’

‘शरीरातील पाणी कमी न होऊ देणे महत्त्वाचे’

डेंग्यूरुग्णाची प्रकृती गंभीर होण्याचा आणि रुग्णाच्या शरीरातील पाणी कमी होण्याचा (डीहायड्रेशन) जवळचा संबंध असल्याचेही डॉ. प्राची साठे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘तीव्र ताप असताना शरीरातील पाणी कमी होत असते, शरीरात आतल्या आत रक्तवाहिन्यांमधून पाण्याचे स्त्रवणही होऊ शकते. शिवाय रुग्ण नेहमीसारखे खात-पीत नसतो, त्यामुळे डीहायड्रेशनची शक्यता वाढते. सुरूवातीच्याच काळात डीहायड्रेशन टाळण्यासाठी उपाययोजना केल्यास प्रकृतीत गुंतागुंत होणे टळू शकते.’

रुग्णाला बाहेरुन प्लेटलेट देण्याचे ढोबळ नियम काय?
– ‘प्लेटलेट काऊंट’ १० हजार किंवा त्यापेक्षा खाली गेला तर बाहेरुन प्लेटलेट दिल्या जातात.
– प्लेटलेट काऊंट १० हजार पेक्षा कमी झालेला नसला तरी तो कमी होत असला आणि बरोबरीने रुग्णाला रक्तस्त्राव होत असेल (नाकातून, दातातून इ. ‘क्लिनिकल ब्लीडिंग’) तरी प्लेटलेट दिल्या जातात.
– रुग्णाची प्रकृती व इतर आजार यानुसार हा नियम बदलू शकतो.