मराठा क्रांती मूक मोर्चात आज (२५ सप्टेंबर) शहरातील वेगवेगळय़ा भागांत वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हय़ाच्या वेगवेगळय़ा भागांतून मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी वाहनतळावर वाहने लावून मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठा क्रांती मोर्चात मोठय़ा प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपनगर आणि पुणे जिल्हय़ाच्या वेगवेगळय़ा भागांतून येणाऱ्या वाहनचालकांसाठी वाहने लावण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहने लावण्याच्या जागा पुढीलप्रमाणे : पिंपरी-चिंचवड भागातून येणाऱ्यांनी त्यांची वाहने कृषी महाविद्यालय प्रदर्शन मैदान, साखर संकुल, अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान येथे लावावीत. फग्र्युसन रस्त्याने मोर्चात सहभागी व्हावे.

पुणे-सोलापूर रस्त्याने येणाऱ्यांनी त्यांची वाहने गोळीबार मैदान, ईदगाह मैदान येथे लावावीत. तेथे वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्यास भैरोबानाला येथील रेसकोर्स मैदानाच्या उत्तरेकडील मैदान, बीटी कवडे रस्ता येथे वाहने लावावीत. महात्मा गांधी रस्त्याने मोर्चात सहभागी व्हावे. सिंहगड रस्त्याने (खडकवासला, पानशेत, वेल्हा) येणाऱ्यांनी त्यांची वाहने पु. ल. देशपांडे उद्यान, डी. पी. रस्ता ( महालक्ष्मी लॉन्स ते कृ ष्णसुंदर गार्डन) येथे वाहने लावावीत. दांडेकर पूल, शास्त्री रस्त्याने मोर्चात सहभागी व्हावे.

सातारा रस्त्याने (कात्रज, धनकवडी, भोर, वेल्हा, पुरंदर) येणाऱ्यांनी शाहू महाविद्यालय, शिंदे हायस्कूल येथे वाहने लावावीत. स्वारगेट, शिवाजी रस्त्याने मोर्चात सहभागी व्हावे. कोंढवा रस्त्याने (उंड्री पिसोळी, उरुळी, पुरंदर) येणाऱ्यांनी त्यांची वाहने मार्केट यार्ड गुरांचा बाजार, भाजीपाला बाजार, कटारिया हायस्कूल (मुकुंदनगर) येथे वाहने लावावीत. स्वारगेट, शिवाजी रस्त्याने मोर्चात सहभागी व्हावे.

नगर रस्त्याने (आळंदी, चऱ्होली, वाघोली, शिरूर) मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी वाहने गोल्फ क्लब समोरील मैदान, एसएसपीएमएस मैदान (प्रादेशिक परिवहन कार्यालय), मोझे विद्यालय (येरवडा), बीआरटी रस्ता (विश्रांतवाडी) येथे वाहने लावावीत. येरवडा पूल, बंडगार्डन रस्ता, जहाँगीर रुग्णालय, अलंकार चित्रपटगृह मार्गे सहभागी व्हावे. कर्वे रस्ता, पौड रस्त्याने येणाऱ्यांनी म्हातोबानगर, महात्मा सोसायटी, डीपी रस्ता, एकलव्य कॉलेज येथे वाहने लावावीत.

वारजे भागातून येणाऱ्यांनी कर्वेनगर विठ्ठल रखुमाई मंदिर, जिजाई गार्डन, काकडे सिटीलगतची मोकळी जागा येथे वाहने लावावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.