‘सध्याचा जमाना बातमीचा मथळा किंवा ‘ब्रेकिंग न्यूज’ पाहण्याचा आहे. अशा वेळी बातम्या वाचण्याचे किंवा एखाद्या विषयाच्या दोन्ही बाजू समजून घेणे महत्त्वाचे वाटत नाही. या पाश्र्वभूमीवर इंटरनेट या माध्यमातून स्वतंत्र बाण्याचे मुक्त विचारपीठ विकसित करू शकलो, तर लोकशाही बळकट होऊ शकेल,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केले.
वरुणराज भिडे मित्र मंडळातर्फे आयोजित वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती, या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमात चव्हाण यांच्या हस्ते ‘लोकसत्ता’चे सहसंपादक मधु कांबळे यांना वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘महाराष्ट्र वन’ वाहिनीच्या ब्यूरो चिफ प्राची कुलकर्णी, ‘सकाळ’चे बातमीदार गजेंद्र बडे आणि ‘दिव्य मराठी’चे सोलापूर येथील बातमीदार श्रीनिवास दासरी यांना ‘आश्वासक पत्रकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर, उपमहापौर मुकारी अलगुडे, मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, माजी अध्यक्ष प्रा. विलास जोशी या वेळी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले,‘‘ माध्यमसमूहाची आणि पत्रकारांची विश्वासार्हता हा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेगळ्या विचारांचा संपादक स्वतंत्र्यरीत्या काम करू शकत नाही. समाजाचे प्रश्न मांडताना माध्यमांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. पण, काही वेळा माध्यमे दुराग्रही भूमिका घेताना दिसतात. मागील केंद्र सरकारने संमत केलेल्या माहिती अधिकार कायद्यामुळे संशोधन करणाऱ्यांना अधिकृत माहिती सहजगत्या मिळते. त्यामुळे शोध पत्रकारितेमध्ये गुणात्मक बदल झाल्याचे दिसत आहे. निष्पक्षपाती आणि बाणेदार पत्रकार हाच समाजामध्ये परिवर्तन घडवू शकतो. इंटरनेट माध्यमाद्वारे स्वतंत्र पत्रकारिता उदयास येत आहे. त्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या मतांचे स्वागत करून मुक्त विचारपीठ विकसित करू शकलो तर लोकशाही समृद्ध होईल.’’
पळशीकर म्हणाले,‘‘इंटरनेट, फेसबुक, ट्विटर ही माध्यमे वापरणाऱ्यांची संख्या दहा टक्केदेखील नसल्यामुळे मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा दबदबा कायम राहणार आहे. माहिती आणि झटपट मते जाणून घेण्याच्या काळात माध्यमांचे राजकारणातील प्रस्थ वाढत आहे. पण, माध्यमे आणि राजकारण यांच्यातील लक्ष्मणरेषाही टिकून राहिली पाहिजे. माध्यम संचलित राजकारण करण्याचे प्रयत्न होत आहेत. राजकारण्यांबद्दलची विश्वासार्हता कमी झाल्यामुळे लोक निर्णय घेण्यासाठी माध्यमांकडे आशेने पाहत आहेत. त्यामुळे आपली विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे काम माध्यमांना जबाबदारीपूर्वक करावे लागेल.’’
बापट म्हणाले,की राजकारण्यांवरील लोकांचा विश्वास उडाला तरी हरकत नाही, पण पत्रकारितेवरील विश्वास उडाला तर, लोकशाहीच्यादृष्टीने ते योग्य होणार नाही.
वरुणराज भिडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून मधु कांबळे म्हणाले,‘‘ पत्रकारिता तटस्थ असली पाहिजे, ही अपेक्षा असली तरी काही निर्णायक क्षणी पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. न्यायालयाप्रमाणे पत्रकारांनाही घटनेचे अधिष्ठान असले पाहिजे. पत्रकार हा अंधश्रद्धामुक्त आणि धर्मनिरपेक्ष असला पाहिजे.’’ अन्य पुरस्कारविजेत्यांनीही मनोगत व्यक्त केले. उल्हास पवार यांनी प्रास्ताविक केले. सूर्यकांत पाठक यांनी आभार मानले.