मोकळ्या भूखंडाचा भाजीविक्रेत्यांकडून अनधिकृतरित्या वापर
कृष्णानगर येथे पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या भाजी मंडईचा वापर न करता शेजारीच प्राधिकरणाच्या रिकाम्या भूखंडाचा वापर भाजी विक्रेत्यांकडून अनधिकृतपणे केला जात आहे. त्यामुळे प्राधिकरणाने बांधलेल्या मंडईची दुरवस्था झाली असून तेथील दरुगधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नागरिकांच्या सुविधेसाठी कृष्णानगर येथे स्पाईन रस्त्याच्या जवळ भाजी मंडईसाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर भाजी मंडई बांधली आहे. या मंडईमध्ये ६४ गाळे आणि तेवढेच ओटे बांधण्यात आले आहेत. मात्र वापर नसल्यामुळे भाजी मंडईमधील गाळे, ओटे तसेच मंडईचे छत मोडकळीस आले आहे. शेजारील झोपडपट्टीतील तसेच या भाजी मंडईच्याच शेजारी उभारलेल्या अनधिकृत भाजी मंडईतील नागरिकांकडून मंडईचा स्वच्छतागृहासारखा वापर केला जात असल्याने तिथे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
शेजारील भाजी मंडईतील विक्रेते या ठिकाणी सडक्या भाज्या टाकून देतात. त्यामुळे कचऱ्याचा खच निर्माण होतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना दरुगधी सहन करावी लागते. मंडईच्या शेजारी प्राधिकरणाने पेठा विकसित केल्या आहेत. शिवाय मोठ-मोठी हॉटेल आणि दुकाने येथे आहेत. या मंडईमुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून न्यू साई ट्रेिडगमधील चार कामगारांना डेंग्यूची लागणही झाली होती. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या भाजी मंडईचा वापर होत नाही. मात्र, स्पाईन रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या रिकाम्या जागेचा आणि प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर भाजी विक्रेत्यांनी अनधिकृतपणे आपले व्यावसाय सुरू केले आहेत.

भाजी नव्हे, ‘कचरा’ मंडई
भाजी मंडईचा वापर होत नसल्यामुळे नागरिकांकडून या ठिकाणी कचरा टाकला जातो. त्यामुळे दरुगधीचा सामना करावा लागतो. येथील घाणीमुळे या भागातील नागरिकांचे तसेच आमच्याकडे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे भाजी मंडईचा वापर लवकर सुरू केल्यास येथे अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे या भागातील एक खासगी व्यावसायिक तुकाराम जाधव यांनी सांगितले.