पावसाअभावी पाण्याची स्थिती गंभीर झाली असतानाच शहराच्या बाजारात येणाऱ्या फळभाज्यांची आवकही कमी झाली आहे. परिणामी शहरात भाज्यांचे दर कडाडले आहेत. सध्या टोमॅटो चांगलाच भाव खाऊन जात असून, स्थानिक बाजारात टोमॅटोचा दर प्रतिकिलो पन्नास ते नव्वद रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पाणी नसल्याने फळभाज्या व पालेभाज्यांचे उत्पन्न घटले आहे. पुणे शहरामध्ये गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये जिल्ह्याबरोबरच परराज्यातूनही भाज्यांची आवक होत असते. मात्र, उत्पन्नच घटले असल्याने आवकही कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोसह भेंडी, गवार, दोडका, सिमला मिरची व कोबी या फळफाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येते.
शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थानिक बाजारामध्ये भाज्यांचे दर वेगवेगळे असल्याचेही चित्र आहे. काही ठिकाणी टोमॅटो पन्नास रुपये किलो, तर काही ठिकाणी चक्क नव्वद ते शंभर रुपये किलोने विक्री होत असल्याचे चित्र आहे. कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत. महात्मा फुले मंडईमध्येही भाज्यांचे दर तेजीत आहेत. येथेही आवक घटल्याने घेवडा, गवार आदी भाज्या तुरळक प्रमाणात दिसत आहेत. भाज्या बाजारात येत नसल्याने काही गाळे बंद ठेवण्यात आल्याचेही दिसून येत आहे. विहीर किंवा शेततळी असलेल्या भागामध्येच सध्या भाज्यांचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र, पाऊस लांबल्याने त्यातील पाण्यावरही मर्यादा येत आहेत. सध्या मान्सून आणखी लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाऊस येईपर्यंत भाज्यांचे दर कमी होऊ शकणार नसल्याचे मत विक्रेत्यांकडून व्यक्त केले जात आहे.