सिंहगड रस्त्यावरील सहा सोसायटय़ांमधील ९० गाडय़ा जाळल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या व्यक्तीवर गाडय़ा जाळल्याचे अनेक गुन्हे दाखल असून त्याच्याकडे अधिक तपास केला जात आहे. या प्रकरणी गुन्ह्य़ात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
अमन अब्दुलगनी शेख ( वय ३२, रा. साई पॅलेस, वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शेख याने गाडय़ा जाळल्याबाबतचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावरील सूर्यानगरी बिल्डिंग, अक्षय ग्लोरी अपार्टमेन्ट, अवधूत आर्केट, स्वामी नारायण अपार्टमेन्टची ए व बी विंग, नऱ्हेतील राम हाईट या सोसायटय़ांमधील रविवारी (२८ जून) पहाटे ९० वाहने जळण्यात आली आहेत. गाडय़ा जाळणारी व्यक्ती दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही चित्रीकरणात कैद झाली होती. पोलिसांनी त्यावरून त्याचे रेखाचित्र तयार करून वीसजणांची यामध्ये चौकशी केली आहे.
लष्कर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आत्मचरण शिंदे यांना शुक्रवारी रात्री गाडय़ा जाळणाऱ्या एका संशयिताची माहिती मिळाली. त्यांनी स्वारगेट पोलीस ठाण्याला कळवून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यास सांगितले. वडगाव बुद्रुक परिसरातून शेख याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या. तो चालताना लंगडत असल्याचे दिसून आले. त्याने यापूर्वी देखील गाडय़ा जाळल्या आहेत. त्याच्यावर या प्रकरणी गुन्हेदेखील दाखल आहेत. शेख याची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. शेख हा साई पॅलेस इमारतीमध्ये राहण्यास असून त्याचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. त्याचे स्टेशनरीचे दुकान असून छोटीशी बेकरी देखील आहे. त्याचे वडील एका प्रसिद्ध कंपनीतून व्यवस्थापकपदावरून निवृत्त झाले आहेत, तर आई ही ससून रुग्णालयात नर्स म्हणून निवृत्त झाल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पठारे यांनी सांगितले की, सबळ पुरावा मिळाल्यानंतर शेख याला अटक करण्यात आली आहे. त्याने गाडय़ा का जाळल्या याचा तपास केला जात आहे. गाडय़ा जाळल्याचे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. १९९७ साली अल्पवयीन असताना त्याने खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर २००६ साली त्याने १७ गाडय़ा जाळल्या होत्या. तसेच एका वर्षांपूर्वी तो राहात असलेल्या सोसायटीजवळील एका ठिकाणी गाडी जाळली होती. तसेच, त्याने काही गाडय़ांचे सीटकव्हर फाडले होते. शेख याला रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.