ऑनलाईन पद्धतीने वाहन चालविण्याचा परवाना काढण्याच्या प्रक्रियेसाठी परिवहन विभागाचे संकेतस्थळ रात्री बाराला सुरू होत असल्याने त्यासाठी अक्षरश: जागरण करावे लागत होते. ही समस्या दूर झाल्याने नागरिकांचे जागरण टळले असले, तरी वाहन चालविण्याच्या चाचणी मार्गाची क्षमता तितकीच असल्याने चाचणी प्रक्रियेतून होणारे हाल मात्र कायम आहेत. अद्यापही प्रत्यक्ष चाचणी मार्गावर पोहोचण्यासाठी नागरिकांना पाच ते सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शिकाऊ व पक्का वाहन परवाना मिळविण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात.  परवाना मागणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने चार ते पाच महिन्यांपर्यंत शिकाऊ परवान्याच्या परीक्षेसाठी वेळच मिळू शकत नाही. हे मोठे दिव्य पार केल्यानंतर प्रत्यक्षात वाहन चालविण्याची चाचणीसाठी वेळ घेताना नाकीनऊ येत असताना त्याबाबतचे संकेतस्थळ रात्री बाराला सुरू होत असल्याने समस्येत आणखी भर पडली होती. रात्री बाराला संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर पुढील वीस ते पंचवीस मिनिटांत संबंधित दिवसांच्या वेळा आरक्षित होत असल्याने चाचणीची वेळ घेण्यासाठी रात्री जागरण करावे लागत होते. परिवहन उपायुक्त (संगणक) संदेश चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घालून ही त्रुटी दूर केल्याने हे संकेतस्थळ आता सकाळी आठ वाजता सुरू होत आहे. त्यामुळे एक मोठी गैरसोय टळली आहे.
एक गैरसोय दूर झाली असली, तरी चाचणी मार्गाच्या क्षमतेअभावी होणारा त्रास मात्र कायम आहे. चारचाकी वाहन चालविण्याची चाचणी सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक संशोधन संस्थेच्या अत्याधुनिक चाचणी मार्गावर घेतली जाते. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय व िपपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या नागरिकांची वाहन चाचणी या ठिकाणी होते. वाहन चाचणीचा अत्याधुनिक मार्ग अतिशय उत्तम व योग्य असला, तरी वाहन परवाना मागणाऱ्यांच्या तुलनेत त्याची क्षमता कमी आहे. पुणे आरटीओकडून दररोज साडेचारशे नागरिकांना शिकाऊ वाहन परवाना दिला जातो. त्यामुळे या सर्वानाच सहा महिन्यांच्या आत पक्क्य़ा वाहन परवान्याच्या चाचणीसाठी वेळ मिळणे गरजेचे आहे. मात्र, प्रत्यक्षात चाचणी मार्गावर एका दिवसात पुण्यातील १२५ जणांचीच वाहन चाचणी घेतली जाते. ही क्षमता आता पाचने वाढवून १३० करण्यात आली असली, तरी फारसा फरक पडलेला नाही. अनेकांना ही चाचणी देऊन प्रत्यक्ष परवाना मिळविण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो.
वाहन चाचणीसाठी पर्यायी मार्गाची मागणी
वाहन चालविण्याची चाचणी देण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता इतर पर्यायी ठिकाणीही चाचणी घेऊन क्षमतावाढ करण्याची मागणी सध्या होत आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे याबाबत म्हणाले, की पुण्यात वाहनांची संख्या लक्षात घेता आणखी दोन ते तीन उपप्रादेशिक कार्यालये हवी आहेत. परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची होणारी हेळसांड टाळण्यासाठी सध्याच्या चाचणी मार्गावर केवळ व्यावसायिक वाहनांच्या चालकांची चाचणी घेतली जावी. इतर वाहनांच्या चालकांची चाचणी पूर्वीप्रमाणे आळंदी रस्ता कार्यालयात व्हावी. पिंपरी-चिंचवडमधील चालकांची चाचणी त्याच कार्यालयाच्या जागेत व्हावी. त्यातून नागरिकांची समस्या मोठय़ा प्रमाणावर दूर होऊ शकेल. परिवहन उपायुक्त संदेश चव्हाण यांच्या पुढाकाराने ऑनलाईनच्या संकेतस्थळाबाबत त्रुटी दूर झाली असून, इतरही काही गोष्टीत सुधारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.