दसऱ्याच्या मुहूर्तावर यंदा शहरात वैयक्तिक वापराच्या वाहनांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहन नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे. १९ ते २२ ऑक्टोबर या चारच दिवसांच्या कालावधीत एकूण ३,७७३ नव्या वाहनांची नोंदणी झाली. यामध्ये दुचाकी व मोटारींची संख्या सर्वाधिक असून, नोंदणीनंतर २,५३३ दुचाकी व १,०९४ नव्या मोटारी रस्त्यावर आल्या आहेत. मागील दसऱ्याच्या तुलनेत यंदा या दोन प्रकारांतील वाहनांच्या विक्रीत दीड पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासासाठी वैयक्तीक वाहनांची वाढती गरजही अधोरेखित झाली आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावर वाहनांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर केली जाते. दसऱ्याच्या पूर्वी काही दिवस वाहन खरेदी करून दसऱ्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करून पूजनासाठी वाहन घरी नेले जाते. त्यामुळे आरटीओ कार्यालय दसऱ्याच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले होते. वाहनांच्या नोंदणीसाठी बुधवारी सकाळपासूनच आरटीओ कार्यालयामध्ये वाहन चालकांची गर्दी झाली होती. मुहूर्तावर वाहनांची पूजा करता यावी, यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू होती.
मागील अनेक वर्षांपासून वैयक्तीक वाहनांच्या खरेदीमध्ये होणाऱ्या वाढीमध्ये यंदा दुष्काळी स्थिती असल्याने घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, सद्यस्थिती पाहता वाहनांच्या विक्रीत वाढच झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर १,९५६ दुचाकी, तर ५९७ नव्या मोटारींची नोंद झाली होती. यंदा दुचाकीच्या संख्येने अडीच हजारांचा आकडा ओलांडला, तर मोटारींची संख्या जवळपास दुप्पट झाल्याचे दिसून येते. नव्या वाहनांची नोंदणी वाढल्याने नोंदणी शुल्क व कराच्या रुपाने आरटीओच्या तिजोरीत चारच दिवसांमध्ये तब्बल ११ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. त्यात मोटारींच्या नोंदणीतून नऊ कोटी ६५ लाख रुपये, तर दुचाकीच्या नोंदणीतून एक कोटी २० लाख रुपये मिळाले आहेत.

व्यावसायिक वाहन खरेदीत घट
प्रवासाची गरज म्हणून वैयक्तीक वाहनांच्या खरेदीमध्ये यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदवली गेली असली, तरी दुसरीकडे व्यावसायिक वाहनांच्या खरेदीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर ८८ प्रवासी बस, १०४ मालवाहू वाहने, ७६ टुरिस्ट टॅक्सी, ७१ रिक्षांची नोंदणी झाली होती. यंदा १३ प्रवासी बस, ७२ मालवाहू वाहने, ५४ टुरिस्ट टॅक्सी, तर ७ रिक्षांची नोंदणी झाली. प्रवासी व मालवाहतुकीला उठाव नसल्यानेच या वाहनांची खरेदी कमी झाल्याचा अंदाज जाणकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.